जम्मूत काँग्रेस खिंडीत (अग्रलेख)   

जम्मू-काश्मीरमध्ये प्रचारासाठी काँग्रेस निवडक चेहेर्‍यांवर अवलंबून राहिला आहे. पक्षाचे व मित्र पक्षांचे नेते आणण्यात पक्षाला यश का आले नाही? विशेषत: जम्मू भागात त्यांचा प्रचार कमकुवत दिसत आहे.
 
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा उद्या पार पडत आहे. या टप्प्यात ४० मतदारसंघांत मतदान होत आहे. आतापर्यंत दोन टप्प्यांत राज्यात शांततेत मतदान पार पडले आहे. तिसर्‍या टप्प्यातही हाच कल राहण्याची शक्यता आहे. शांत वातावरणापेक्षाही कोणत्या पक्षाकडे किंवा आघाडीकडे मतदारांचा कल आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला कडवे आव्हान उभे करण्याचा ’इंडिया’ आघाडीचा प्रयत्न आहे. राज्यात या आघाडीत काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स हेच प्रमुख पक्ष आहेत. मेहबूबा मुफ्ती यांचा ’पीडीपी’ हा पक्ष आघाडीत नसला तरी भाजपला विरोध करण्यासाठी ’इंडिया’च्या बाजूने आल्याचे ते सांगत आहेत. त्याचा ’इंडिया’ला फायदा जास्त होतो, की भाजपला ते निकालानंतर कळेलच; मात्र नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांचेही सख्य कितपत कायम आहे याचीही शंका आहे. पहिल्या दोन्ही टप्प्यांतील प्रचारात या पक्षांचे वरिष्ठ नेते क्वचितच एकत्र दिसले. बंडाळीने दोन्ही पक्षांना ग्रासले आहे हा भाग आणखी वेगळा. शेवटच्या टप्प्यात जम्मू भागातील मतदार संघ जास्त आहेत. तेथे ’इंडिया’ आघाडीची कसोटी लागणार आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा रद्द झाल्या आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

कागदावर ऐक्य?

जम्मू-काश्मीरची निवडणूक एकत्र लढवण्याचे नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसने ठरवले. त्याचे कारण दोघेही स्वतंत्रपणे राज्यात काहीच करू शकत नाहीत. एकूण ९० पैकी नॅशनल कॉन्फरन्सकडे ५१ व काँग्रेसकडे ३२ जागा आल्या आहेत. पाच मतदार संघांत या दोन्ही पक्षांत ‘मैत्रीपूर्ण लढती’ होत आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा करार कितपत विश्वासार्ह  मानावा असा संभ्रम मतदारांत निर्माण झाल्यास ते चुकीचे ठरणार नाही. नॅशनल कॉन्फरन्सकडे काश्मीर खोर्‍यातील जागा जास्त आहेत, तर काँग्रेसकडे जम्मूमधील जास्त जागा आल्या आहेत. विशेष राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द केल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणूक होत असल्याने उमेदवारी मागणार्‍यांची संख्या सर्वच पक्षांत जास्त आहे. नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसमध्ये त्यामुळेच बंडाळी झाली; पण ती सीमित ठेवण्यात आतापर्यंत तरी दोघांना यश आले आहे. नव्या सरकारकडे स्पष्ट बहुमत असावे व जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, यावर दोन्ही पक्षांत एकमत आहे. ३७०वे कलम पुन्हा लागू करावे अशी नॅशनल कॉन्फरन्सची मागणी आहे, त्यावर काँग्रेस मौन बाळगून आहे. अखेरच्या टप्प्याला जेमतेम आठवडा उरला होता, तरीही जम्मू भागातील प्रचारात ’इंडिया’चा जोर दिसला नव्हता. त्यामुळे उमर अब्दुल्ला यांनी चिंताही व्यक्त केली होती.  लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या गेल्या शुक्रवारी जम्मू भागात दोन सभा होणार होत्या; मात्र खराब हवामानामुळे दिल्लीहून विमानाचे उड्डाण न झाल्याने ते जम्मूला पोहोचू शकले नाहीत. हे वास्तव असले तरी आघाडीला या भागात प्रचारात रस नसल्याची भावना पसरू शकते. अन्य राज्यांतील नेतेही जम्मू-काश्मीरमध्ये आणण्यात काँग्रेस कमी पडला आहे. आपल्या पक्षाने काँग्रेसला जम्मूत जास्त जागा दिल्या; पण त्या भागात  त्यांनी जी कामगिरी करणे अपेक्षित होते तशी झालेली नाही, अशी खंत उमर यांनी बोलूनही दाखवली. शेवटच्या टप्प्यात ज्या ४० मतदार संघात मतदान होत आहे. त्यापैकी २४ मतदार संघ जम्मू, उधमपूर, सांबा व कथुआ या जिल्ह्यात आहेत. येथे काँग्रेस २१ जागा लढवत आहे. सरकार स्थापनेची किल्ली या चार जिल्ह्यांकडे असल्याचे मानले जाते. भाजपनेही जम्मू भागावरच जास्त लक्ष केंद्रित केले आहे. मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा, मेळावे आयोजित करून पक्षाने प्रचाराचा धुरळा उडवला आहे. त्या तुलनेत काँग्रेसचा प्रचार कमकुवत दिसत आहे. बंडखोर, पीडीपी व अन्य छोटे पक्ष किती मते मिळवतात यावरही काँग्रेसच्या यशाचे गणित अवलंबून आहे. सध्या तरी जम्मूत काँग्रेस अडचणीत असल्याचे दिसत आहे.
 

Related Articles