कांद्याचे भाव शंभरी गाठणार   

वृत्तवेध 

येत्या काही दिवसांमध्ये कांद्याचे भाव आणखी वाढू शकतात. कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्कात नुकतीच २० टक्के कपात केली आहे. त्यामुळे कांद्याच्या घाऊक दरात वाढ होत असून किरकोळ बाजारातही कांद्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. ही वाढ शंभर रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या किरकोळ बाजारात त्याची विक्री ६० ते ८० रुपये किलो दराने होत आहे.
 
गाझीपूर, ओखला आणि आझादपूर भाजी मंडईसह दिल्लीतील सर्व भाजी बाजारांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक येथून कांद्याचा पुरवठा केला जातो. कांदा व्यापारी श्रीकांत मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, तीन दिवसांपूर्वी बाजारात कांद्याची घाऊक किंमत ३५ ते ४५ रुपये किलो होती; मात्र सरकारने कांद्याच्या निर्यात शुल्कात २० टक्के कपात केली. त्यामुळे बाजारात कांद्याचे घाऊक दर किलोमागे पाच रुपयांनी वाढले. कांद्याच्या घाऊक भावाने ५० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. येत्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर आणखी वाढू शकतात. कांद्याचे नवीन पीक येण्यास वेळ लागणार आहे. सध्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातूनच कांद्याचा पुरवठा होत आहे. राजस्थानमधील साठा जवळपास संपला असून त्यामुळे बाजारात कमी कांदा येत आहे. किरकोळ बाजारात कांद्याचा भाव ८० रुपयांपेक्षा जास्त आहे. येत्या काही दिवसांमध्ये कांद्याचे भाव १०० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
 
सरकारने अलीकडेच कांद्यावरील किमान निर्यात शुल्क मर्यादा हटवली आहे. आतापर्यंत कांद्यावरील एमईपी ५५० डॉलर प्रति टन निश्चित करण्यात आली होती; परंतु परकीय व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) अधिसूचना जारी केली आणि तात्काळ प्रभावाने आणि पुढील आदेशापर्यंत शुल्क मर्यादा काढून टाकली. त्यामुळे शेतकर्‍यांना परदेशात दर्जेदार कांदा अधिक किमतीत विकता येणार आहे. कांद्याची खुली निर्यात केल्यानंतर देशात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कांद्याचे भाव वाढणार आहेत. कांद्याचे  नवीन पीक येण्यास सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अशा स्थितीत नवीन कांदा बाजारात येणार नाही. शेतकरी स्टॉकमध्ये असलेलाच कांदा निर्यात करतील. नवीन आवक न झाल्याने कांद्याची एकूण आवकही कमी होणार आहे. अशा परिस्थितीत बाजारात कांदा कमी उपलब्ध होऊ शकतो. या परिस्थितीमध्ये कांद्याची किंमत वाढू शकते.

Related Articles