रेल्वे अपघातांमागे दहशतवादी?   

अजय तिवारी

देशात गेल्या महिनाभरात  झालेले रेल्वेचे अपघात हे अपघात नसून रेल्वे यंत्रणा विस्कळीत करण्याच्या कारस्थानाचा  भाग आहेत. त्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा, केंद्रीय गुप्तचर विभाग, दहशतवादविरोधी पथक आणि वेगवेगळ्या राज्यांच्या तपास यंत्रणांचा हा निष्कर्ष आहे. सामान्य प्रवाशांची जीवनरेखा समजली जाणारी रेल्वेची यंत्रणा आता अतिरेक्यांचे   लक्ष्य बनली आहे.
 
तीन युद्धे  आणि  छुप्या युद्धातून (‘प्रॉक्सी वॉर’) हाती काहीच न लागल्याने आता पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतातील रेल्वेला लक्ष्य केले आहे. रुळांवरून गाड्या घसरण्याच्या घटना या अपघात नाहीत, तर नियोजनबद्ध कटाचा भाग आहेत. गेल्या सुमारे दीड महिन्यात अशा १९ घटना उघडकीस आल्या आहेत. कधी गॅस सिलिंडर, कधी सायकल, कधी दगड तर कधी लोखंडी खांब  रुळांवर सापडले आहेत. हा धोका मोठा आहे.
 
देशातील बहुतांश नागरिक स्वस्त आणि सुलभ प्रवासासाठी रेल्वेची निवड करतात. जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या निवडणुका अतिशय सुरळीत पार पडल्या. आता विधानसभेच्या निवडणुकीत तिथे काहीच करता येत नसल्यामुळे अन्य ठिकाणांना लक्ष्य करण्यावर दहशतवाद्यांचा भर आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क  मोठे आहे; परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्याचा फायदा दहशतवाद्यांनी घेतलेला दिसतो. रेल्वेगाड्या रुळावरून घसरण्याचे प्रमाण अगोदरच जास्त आहे. जुने रूळ, देखभाल दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष नसणे आदी कारणे त्यामागे होती. आता त्यात घातपातातांची  भर पडली आहे. सरकारने पायाभूत सुविधा वाढवण्याकडे लक्ष दिले असले, तरी जनतेच्या मागण्या आणि रेल्वेच्या वाट्याला येणारा निधी याचे प्रमाण व्यस्त असल्याचा फटका रेल्वेच्या सुरक्षेला बसत आहे.
 
काही वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी शहरी उपनगरी सेवांना लक्ष्य केले होते. बाँबस्फोट घडवून आणले जात होते. आता दहशतवाद्यांनी शहरांपासून दूर आणि दुर्गम भागातील रेल्वेरुळांवर वेगवेगळ्या वस्तू ठेवून ट्रेन रुळावरून घसरतील, मोठे अपघात होतील, अशी कृत्ये करण्यावर भर दिला आहे. सुदैवाने अशा स्वरुपाच्या घटनांमध्ये मोठे नुकसान झाले नाही.
 
रुळांवर वेगवेगळे अडथळे  सापडण्याच्या घटना विशिष्ट शहरांमध्ये किंवा राज्यांमध्येच घडल्या आहेत, असे नाही. अशा घटना उत्तर प्रदेशापासून ओडिशापर्यंत आणि तेलंगणापासून मध्य प्रदेशापर्यंत सर्वत्र घडल्या आहेत. ८ सप्टेंबर रोजी राजस्तानच्या अजमेर जिल्ह्यात रेल्वेगाडी  रुळावरून घसरवण्याचा कट उघडकीस आला. दहशतवाद्यांनी अजमेरजवळ सरधना आणि बांगर ग्राम रेल्वे स्थानकादरम्यान दोन ठिकाणी रुळांवर ७० किलो वजनाचे सिमेंटचे ब्लॉक्स ठेवले होते.   ते तोडत मालगाडी पुढे गेली आणि कोणताही अपघात झाला नाही. राजस्तानमध्ये रेल्वे रुळावरून घसरवण्याचा हा तिसरा कट उघडकीस आला.   डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशनच्या आणि रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) यांनी एकत्रितपणे सारधना ते बांगर ग्राम स्थानकापर्यंत गस्त घातली. कानपूरच्या बिल्हौरजवळ कालिंदी एक्स्प्रेस रुळावरून उतरवण्याच्या कटामागे ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेच्या खोरासन गटाचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. यासाठी  अनेक तपास यंत्रणांनी कानपूरमध्ये तळ ठोकला असून कटाशी संबंधित प्रत्येक घटकाची कसून चौकशी केली जात आहे. कानपूरमध्ये गेल्या एका महिन्यात रेल्वे मार्गाचे नुकसान करून गाडी रुळावरून उतरवण्याचे दोन कट उघडकीस आले. याच गटाने  २०१७ मध्ये भोपाळ रेल्वे स्थानकावर  टाईम बॉम्ब ठेवला होता. त्याचा स्फोट होऊन अनेक प्रवासी जखमी झाले होते. यानंतर तेलंगणाच्या दहश्शतवाद विरोधी पथकाला मिळालेल्या  माहितीवरून उत्तर प्रदेश ‘दहशतवाद विरोधी पथकाने ’ने या गटाचा  सदस्य सैफुल्ला याचा  लखनौमध्ये खात्मा केला.. त्याच्याकडे सिलिंडर बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि ‘आयईडी’ आदी साहित्य सापडले.अलिकडे २३ ऑगस्ट रोजी पाली येथे अहमदाबाद-जोधपूर वंदे भारत गाडी रेल्वे मार्गावरील्ल  सिमेंट ब्लॉकला धडकली होती; मात्र या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. २८ ऑगस्ट रोजी बरन जिल्ह्यातील छाबरा येथे मालगाडीच्या र् मार्गावर भंगार फेकण्यात आले होते. उत्तर प्रदेशमधील लखनौ विभागातील लालगोपालगंज स्टेशनजवळ रेल्वे मार्गावर एक सायकल आणि गॅस सिलिंडर ठेवलेले आढळले. या प्रकरणी गुलजार या संशयिताला अटक करण्यात आली. तो गॅस सिलिंडर आणि सायकल रेल्व मार्गावर ठेवल्यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता. हा व्हिडिओ त्याने यूट्यूबवरही अपलोड केला! याखेरीज कानपूर शहरातील गोविंदपूर आणि भीमसेनजवळ साबरमती एक्स्प्रेसचे २० डबे रुळावरून घसरले. ट्रेनचे लोको पायलट ए.पी. बुंदेला यांच्या म्हणण्यानुसार, काही तरी आदळल्यानंतर ट्रेन रुळावरून घसरली. घटनास्थळी जुन्या रेल्वे ट्रॅकचा तुकडा (सुमारे ३ फूट लांब) आणि लोखंडी कडी सापडली.
 
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी स्टेशन यार्डजवळ ट्रॅकवर ‘फाऊलिंग मार्क स्टोन’ सापडला. त्याची लांबी चार फूट, रुंदी अर्धा फूट आणि वजन ८०-९० किलो इतके होते. रेल्वे मंत्रालय चोवीस तास रेल्वे मार्गांची सुरक्षा करण्यासाठी एआय आधारित विविध उपायांवरही विचार करत आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की रेल्वे सुरक्षा दल तसेच ट्रॅक मेंटेनन्सचे कर्मचारी वर्षभर नियमित अंतराने रात्रंदिवस गस्त घालतात आणि साबरमती एक्सप्रेस दुर्घटनेनंतर अधिक सावध  झाले आहेत; परंतु कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे वर्षभर रात्रीची गस्त करता येत नाही. रेल्वे वाहतूक विस्कळीत करण्यासाठी ट्रॅकवर मुद्दाम एखादी जड वस्तू ठेवली होती का, याचाही रेल्वे तपास करत आहे. प्रतिकूल हवामानात रेल्वे रुळांच्या देखभालीच्या उद्देशाने रात्रीच्या गस्तीची तरतूद आहे; असामाजिक कृत्यांपासून सुरक्षित करण्याच्या हेतूने नाही, असे रेल्वे अधिकार्‍यांनी म्हटले आहे. याचाच दहशतवादी फायदा घेत आहेत. परिणामी, या धाटणीच्या कारवायांकडे अधिक गांभिर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Articles