अरुणाचलमधील शिखराला सहाव्या दलाई लामांचे नाव   

भारताने अरुणाचल प्रदेशातील एका शिखराला सहावे दलाई लामा त्सांगयांग ग्यात्सो यांचे नाव दिले आहे. भारताच्या या निर्णयाने चीनचा जळफळाट झाला असून, चीनने या भागावर पुन्हा एकदा आपला दावा सांगितला आहे. 

निमासकडून नामकरण 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स (निमास) च्या १५ सदस्यीय संघाने हिमालयातील गोरीचेन पर्वत रांगेतील २० हजार ९४२ फूट उंचीच्या अज्ञात शिखरावर यशस्वी चढाई केली. अनेक आव्हानांवर मात केल्यानंतर या संघाने ६ वे दलाई लामा, रिगेन त्सांगयांग ग्यात्सो यांच्या सन्मानार्थ या शिखराला ‘त्सांग्यांग ग्यात्सो पीक’ असे नाव दिले. 

आव्हानात्मक शिखर 

तवांग-पश्चिम कामेंग प्रदेशावरील गोरीचेन श्रेणीतील समुद्रसपाटीपासून ६ हजार ३८३ मीटर उंचीवर हे शिखर आहे. या प्रदेशातील सर्वांत तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि अनपेक्षित शिखरांपैकी ते एक मानले गेले आहे. या शिखराचा मार्ग धोकादायक खड्डे, बर्फाळलेले खडक, २ किलोमीटर लांबीची हिमनदी आणि प्रतिकूल हवामानाने भरलेला आहे. 

ग्यात्सो यांचे नाव का देण्यात आले? 

संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत म्हणाले, सहाव्या दलाई लामा यांचे नाव शिखराला देणे, ही त्यांच्या कालातीत बुद्धिमत्तेसाठी तसेच मोनपा समुदायासाठी आणि त्या पलीकडच्या त्यांच्या अगाध योगदानाला आदरांजली आहे. 

चिरस्थायी वारशाचा दाखला 

त्सांगयांग ग्यात्सो हे या भागातील नागरिकांसाठी दीर्घकाळ शहाणपण आणि सांस्कृतिक अभिमानाचे स्रोत आहेत. त्यांची शिकवण आणि तत्त्वज्ञान आम्हाला मार्गदर्शन करत राहील आणि हे शिखर त्यांच्या चिरस्थायी वारशाचा दाखला असेल, असे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी म्हटले आहे. 

चीनचा तीळपापड 

शिखराच्या नामकरणानंतर चीनचा तीळपापड झाला आहे. परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हणाले, भारताने ज्या भागातील शिखराचे नामकरण केले आहे तो जांगनानचा प्रदेश हा चीनचा भाग आहे. भारताने चीनच्या भूभागात तथाकथित अरुणाचल प्रदेश स्थापन करणे बेकायदा आणि अवैध आहे.

नामकरणाची औपचारिकता 

अधिकृत नकाशावर त्सांग्यांग ग्यात्सो शिखर ओळखले जावे यासाठी शिखराचे नामकरण करण्यासाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण केली जात आहे. 

सहावे दलाई लामा कोण होते? 

त्सांगयांग ग्यात्सो हे सहावे दलाई लामा होते. त्यांचा जन्म १ मार्च १६८३ मध्ये अरुणाचल प्रदेशातील मोन तवांग येथे झाला. तरुण वयात त्यांना त्सोना या  मठात अनेक वर्षे निगराणीखाली ठेवण्यात आले होते. १६९७ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना त्यांचे गुरू दुसरे पंचेन लामा यांनी सहावे दलाई लामा म्हणून घोषित केले. मात्र, त्यांनी भिक्षुक म्हणून जीवन नाकारून आनंदी जीवन जगण्यास प्राधान्य दिले. १७०६ मध्ये त्यांना चीनमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी वाटेतच त्यांचे निधन झाले. 

Related Articles