अजित पवारांची कोंडी? (अग्रलेख)   

अजित पवार यांची अलीकडची काही विधाने त्यांची मानसिकता बदलत असल्याचीच साक्ष देतात. शरद पवार यांच्यावर थेट टीका करण्याचे ते टाळतात, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नीला निवडणूक लढवायला लावली ही चूक झाल्याची कबुलीही देतात.
 
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे, तसतसा  राज्यातील राजकारणाला रंग चढत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाची खलबते सुरू झाली आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची कामगिरी चांगली झाली नाही, त्यातच बारामतीत त्यांच्या पत्नीलाच पराभवाला सामोरे जावे लागले. त्या पार्श्वभूमीवर आता विधानसभेच्या निवडणुकीत जागावाटपात त्यांचा पक्ष महायुतीतील अन्य दोन पक्षांना, म्हणजे भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला अडचणीचा वाटू लागला आहे. त्यामुळेच या दोन्ही पक्षांचे नेते आणि मंत्री देखील अजित पवारांच्या अर्थ खात्यावर आणि त्यांच्या पक्षावर उघड टीका करू लागले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत महायुती कमी पडली याचे खापर भाजपकडून अजित पवार यांच्यावर फोडले जात आहे. ‘इंडिया टुडे’च्या मुंबई कॉनक्लेव्हमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लोकसभा निवडणुकीत भाजप कमकुवत पडला का या प्रश्नावर शिंदे यांच्या शिवसेनेची मते आम्हाला जास्त मिळाली. त्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मते कमी मिळाली असे म्हटले आहे. भाजपच्या तुलनेत हे दोन्ही पक्ष मतदारांसाठी नवे असल्याने हे झाले अशी मल्लीनाथीही फडणवीस यांनी केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उपयुक्तता आता भाजपला राहिली नाही, त्यामुळे भाजप आणि शिंदे यांची शिवसेना त्या पक्षाला लक्ष्य करीत आहेत का? असा प्रश्न पडतो. या पार्श्वभूमीवर अजित पवारांची काही विधानेही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतात. करमाळ्यात त्यांच्या जनसन्मान यात्रेत त्यांनी ‘शरद पवार हे आमचे दैवत आहेत, आम्ही चुकलो तर आमचे कान धरा’ असे विधान केले. त्यावरुन अजित पवारांना महायुतीत येऊन चुकीचे काही केल्याचा पश्चात्ताप तर होत नाही ना अशी शंका येते. शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदाराने राहुल गांधी यांच्याबद्दल अश्लाघ्य भाषा वापरल्यानंतर अजित पवारांनी नापसंती व्यक्त केली होती, तर नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल टीका केल्यानंतर केंद्रातील वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळेच अजित पवारांच्या मनात आता पुन्हा मूळ पक्षात जाण्यासंबंधी चलबिचल सुरू आहे का? असा प्रश्न पडतो.

गरज संपली?

अलीकडेच अजित पवार यांनी आपण महायुतीसोबतच आहोत आणि महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार आहोत असे सांगितले आहे. तथापि जागा वाटपात राष्ट्रवादीला समाधानकारक जागा न मिळाल्यास त्यांचे कार्यकर्ते काय भूमिका घेतील हा प्रश्न आहे. भाजपने आतापासूनच १६० ते १७० जागा लढवण्याची भाषा सुरू केली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला शंभर जागा हव्यात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ६० जागांची मागणी असली तरी त्यांच्या वाट्याला केवळ २५-३० जागा येतील. अशा स्थितीत राष्ट्रवादी पक्ष काय करणार? महायुतीतून बाहेर पडून राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार का? किंबहुना तसेच घडावे यासाठी भाजप आणि शिंदे यांची शिवसेना जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे का ? अशीही शंका येते. तसे झाल्यास भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला अधिक जागा मिळू शकतात. यासारख्या विधानातून अजित पवार आपला परतीचा मार्ग सुलभ करतात का, असे वाटल्यावाचून राहात नाही. महायुतीत सामील झाल्यापासूनच शिंदे यांच्या शिवसेनेकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी खटके उडत आहे. निधी वाटपात आपल्यावर अजित पवारांनी अन्याय केल्याच्या तक्रारीही शिवसेनेच्या आमदारांनी केल्या होत्या. लोकसभेच्या निवडणुकीपासूनच अजित पवार गटाची कुचंबणा होत गेली. भाजप आणि शिंदे यांची शिवसेना हिंदुत्वाचे राजकारण करीत असताना वेगळी विचारधारा असलेल्या राष्ट्रवादीची राजकीय कोंडीच होत आहे. महायुतीत त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाला आव्हान दिले जात आहे. चाळीस आमदार पाठीशी असताना जागा वाटपात केवळ २० ते २५ जागांवर अजित पवार समाधान कसे मानणार? मग ते करणार तरी काय?

Related Articles