रामटेकडीतील प्लास्टिक कचर्‍याचा थेट जिल्ह्यातील कंपन्यांच्या बॉयलरसाठी पुरवठा   

प्रकरणाची चौकशी करणार : आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले

पुणे : रामटेकडी येथील महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातील  कचर्‍यातील प्लॅस्टिक आणि कपडे दौंड तालुक्यातील देउळगाव गाडा परिसरातील काही कंपन्यांमध्ये बॉयलर इंधनासाठी पाठविण्यात येत असल्याचे शेतकर्‍यांनी उघडकीस आणल्यानंतर खळबळ उडाली आहे.  प्रत्यक्षात मिक्स कचर्‍यापासून आरडीएफ तयार करून ते इंधन म्हणून वापरण्याची अट असताना थेट कचर्‍यातील प्लास्टिक आणि कपडे कुठलिही प्रक्रिया न करता कोणत्या प्रक्रिया प्रकल्पावरून पाठविण्यात येत आहे, याची चौकशी अतिरिक्त आयुक्तांच्या मार्फत करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले.
 
दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा परिसरात असलेल्या कंपन्यांमध्ये प्लास्टिकचा कचरा भरून जात असलेला ट्रक नुकताच ग्रामस्थांनी पोलिसांना ताब्यात दिला. संबंधित ट्रक चालक बळीराम दगडू भालेराव (वय ४३, रा. सध्या उरुळी कांचन, गारवा हॉटेल पाठीमागे ता. हवेली जि. पुणे, मूळ रा. तोरंबा, ता. लोहारा जि. धाराशिव) याने या ट्रकमधून प्लास्टिक साहित्य रामटेकडी हडपसर येथून आणून जे.व्ही.एस. कंपनी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये बॉयलरचे इंधन म्हणून आणला होता. कचरा वाहतूक करणारा ट्रक ललवाणी ट्रान्सपोर्टचा आहे. पाटस पोलीस चौकीचे पोलीस शिपाई हनुमंत खटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पुणे महापालिकेच्या रामटेकडी परिसरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांमधून दररोज तीन ते चार ट्रक प्लास्टिकचा कचरा येथील कंपन्यांमध्ये येत असतो. यामध्ये चप्पल, बुटांचाही समावेश असतो. कंपनीतील बॉयलर पेटविण्यासाठी इंधन म्हणून या कचर्‍याचा वापर करण्यात येत होतो. येथील कंपन्यांच्या बॉयलरमध्ये दिवसाला जवळपास ४० ते ५० टन  कचरा जाळला जात असून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.  या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक, या परिसरात असलेल्या अभयारण्यातील वन्यप्राणी यांच्या आरोग्याला आणि जीविताला धोका निर्माण झाला आहे. सदर कंपनीने प्रदूषणकारक कचरा जाळू नये असे निवेदन ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र, या निवेदनाला कंपनी व्यवस्थापनाने केराची टोपी दाखवली आहे, असा आरोप येथील नागरिक करत आहेत.
 
दौंड तालुक्यातील औद्योगिक कंपन्या आणि गुर्‍हाळांवर जाळण्यासाठी सर्रासपणे प्लॅस्टिक तसेच चपलांचे, केरकचर्‍याचे ढिग साठवलेले दिसून येतात. प्लास्टिकचा केरकचरा जाळला जात असल्याने काळेकुट्ट धुराचे लोट हवेत जाऊन मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण होत आहे. हा धूर परिसरातील शेतकर्‍याच्या शेतीपिकांवर पडला जात असल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे.यासंदर्भात तक्रार केल्यानंतरही राज्य प्रदूषण महामंडळ तसेच पोलिसांकडूनही कुठलिच कारवाई केली जात नसल्याचाही येथील नागरिकांचा आरोप आहे.     
 
महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातून मिश्र कचर्‍यापासून तयार करण्यात येणार्‍या आरडीएफचा वापर हा ज्या कंपन्यांमध्ये बॉयलरचा वापर त्या कंपन्यांमध्ये इंधन म्हणून करण्यात येतो. परंतु, त्यावर प्रक्रिया करून त्याच्या ब्रिकेट तयार करूनच आरडीएफचा पुरवठा व्हावा असे अपेक्षित असते. यवत पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती घऊन प्लास्टिक आणि कपडे कोणत्या प्रकल्पावरून नेण्यात आले आहेत, याची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. 

- डॉ. राजेंद्र भोसले, पुणे महापालिका आयुक्त.

 

Related Articles