गणेशोत्सवातील धार्मिक विधीसाठी गुरुजींच्या तारखा फुल्ल!   

पुणे : गणेशोत्सवात गणरायाच्या प्रतिष्ठापनेपासून ते गणेश यागापर्यंत, अथर्वशीष पठणपासून ते सत्यनारायण पूजेपर्यंत, गणेशोत्सवातील विविध धार्मिक उपक्रमांसाठी गुरुजींची आवश्यकता असते. मात्र संपूर्ण गणेशोत्सवात शहरातील बहुतांश गुरूजींच्या तारखा आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे विधी करण्यासाठी पुणेकरांना ऐन उत्सव काळात गुरूजींच्या शोधात धावपळ करावी लागणार आहे. 
 
उत्सवातील धार्मिक विधी करण्यासाठी ऐनवेळी गुरूजींची शोधाशोध करायला नको म्हणून सार्वजनिक गणेश मंडळे, तसेच घरगुती गणपतीसाठी पुणेकरांनी गुरूजीच्या वेळा नोंदवून ठेवल्या आहेत. गणेशोत्सवामुळे गुरूजींना पुण्यासह बाहेरच्या शहरातूनही मागणी होत आहे. त्यामुळे संपूर्ण उत्सव काळ गुरूजींची धावपळ होणार आहे. विशेष म्हणजे काही गुरुजी भारतातून थेट ऑनलाइन माध्यमाद्वारे परदेशात राहणार्‍या मराठी भाषकांच्या श्रीगणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची पूजा सांगणार आहेत. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आदी देशांमधील मराठी भाषकांकडून गुरुजींकडे ऑनलाईन पूजेसाठी बुकिंग झाले आहे. गणेशोत्सवाच्या दहाही दिवस गुरुजींच्या तारखा फुल्ल झाल्या आहेत.
 
गुरूजींना उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या पूजेसाठी सर्वाधिक मागणी होत असते. त्यामुळे पहिल्या दिवशी प्रत्येक गुरुजींना किमान दहा ते बारा ठिकाणी पूजेसाठी जावे लागते. घरगुती गणपतीसह मंडळांकडून धार्मिक उपक्रमांसाठी गुरुजींना बोलावण्यात आले आहे. यंदाही गुरुजींनी पूजेच्या बुकिंगसाठी सोशल मीडियाचा वापर केला. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही काही उपक्रमांसाठी बुकिंग झाले आहे. 
 
गुरुजी उमेश जोशी म्हणाले, यंदा धार्मिक उपक्रमांसाठी खूप चांगला प्रतिसाद आहे. उत्सवातील दहा दिवसांत श्रीगणेश मूर्ती प्रतिष्ठापना पूजा, गौरी आवाहन, सत्यनारायण पूजा, गणेशयाग, होम हवन, विसर्जन पूजा आदी धार्मिक उपक्रमांसाठी तारखा बुक आहेत. पुण्यासह मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये पूजेसाठी जाणार आहे. दहाही दिवसातील २५ ते ३० पूजांसाठी तारखा बुक आहेत. 
 
गुरूजी अनुपम कुलकर्णी म्हणाले, उत्सवाच्या धार्मिक उपक्रमांसाठी एक महिन्याआधीपासूनच विचारणा सुरू झाली होती. अनेकांनी तारखाही बुक करून ठेवल्या आहेत. उत्सवातील पहिल्या दिवशी दहा ते बारा पूजा करणार आहे. परदेशातूनही मराठी भाषकांकडून पूजांसाठी विचारणा होत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पूजेसह ऑनलाईनच्या माध्यमातूनही पूजा सांगावी लागणार आहे. 

गुरुजी सांगणार ऑनलाइन पूजा 

पुण्यासह जगभरात गणेशोत्सव साजरा केला जाता. त्यामुळे विविध प्रकारच्या पूजेसाठी गुरूजींना सर्वाधिक मागणी असते. यंदाही मोठ्या प्रमाणात ऑफलाइन-ऑनलाइन धार्मिक उपक्रम होणार आहे. खासकरून परदेशातील मराठी भाषकांकडून ऑनलाइन धार्मिक उपक्रमांसाठी विचारणा होत आहे. त्याची पूजेची गैरसोय दूर करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने आम्ही पूजा सांगणार आहोत. ऑनलाइन पूजेसाठी गुरूजींनी विशेष तयारी केली आहे. त्यामुळे विदेशातील गणेश भक्तांची पूजेची चिंता मिटणार आहे. 
 

Related Articles