असुरक्षित पुणे (अग्रलेख)   

कोयता गँग, हा अलीकडे पुण्याला झालेला कर्करोग. यामध्ये देखील अल्पवयीन मुलांची संख्या लक्षणीय आहे. पालक मंत्र्यांपासून अनेक ज्येष्ठांनी कोयता गँगचा समूळ नायनाट करण्याच्या घोषणा केल्या. त्या अद्याप घोषणा स्वरूपातच आहेत. 
 
शतपावलीसाठी घराबाहेर पडणेही आता पुण्यात सुरक्षित राहिलेले नाही! एकेकाळी निवृत्तीवेतनधारकांचे शहर, ही पुण्याची ओळख होती. निवृत्तीवेतनधारक, अर्थात ज्येष्ठ व्यक्ती कोणत्याही धोक्याशिवाय या शहरात राहू शकत होते. पोलिसांचा दरारा होता. आता चित्र पूर्णपणे बदलले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशासारख्या राज्यांमध्ये पूर्वीच्या काळात वारंवार घडणार्‍या गंभीर गुन्ह्यांच्या घटना पुण्याला आता नवीन राहिलेल्या नाहीत. टोळीयुद्ध अद्याप हद्दपार झालेले नाही. बेकायदेशीर पबच्या नावाने फोफावलेल्या असंस्कृतीमधून केवळ व्यसनाधीनताच वाढली असे नाही, तर गुन्हेगारीला देखील मोकळे रान मिळाले आहे. हडपसर हे पुण्याचे महत्त्वाचे उपनगर. रस्त्यावरून चाललेल्या मुलांच्या टोळक्याने वासुदेव कुलकर्णी या गृहस्थांकडे इंटरनेट वाय फायची मागणी केली. कुलकर्णी यांनी नकार दिल्यावर या मुलांनी धारदार हत्याराने त्यांचा चेहरा ठेचून त्यांची हत्या केली. या मुलांकडे ही घातक शस्त्रे होती, ती जवळ बाळगून हे टोळके निर्धास्तपणे फिरत होते. सर्वसामान्यांचा जीव पुण्यात एवढा स्वस्त झाला आहे? मुळात अपरिचित व्यक्तीकडे इंटरनेट वायफाय मागणे हेच न पटणारे. यातून आलेला स्वाभाविक नकार पचविण्याची कुवतही आरोपींकडे नव्हती. ही घटना अनपेक्षित प्रसंगातून झाली हे मानले तरी घातक शस्त्रे घेऊन पुण्यात कोणीही फिरू शकते, या वस्तुस्थितीचे काय? ती जबाबदारी सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणा घेणार का?

कोयता गँग मोकाट

पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीबद्दल देखील अनेक प्रश्न वेळोवेळी उपस्थित होत आहेत. चित्रपटाचा रात्रीचा खेळ पाहून बाहेर पडणार्‍या एका तरुणाला सेनापती बापट रस्त्यावर पोलिसांचा आलेला विदारक अनुभव अलीकडेच समाजमाध्यमावर गाजत होता. काही दिवसांपूर्वी चंदनचोरांच्या टोळीने प्रभात रस्त्यावर वाहने आडवी लावून रहदारी बंद केली आणि शस्त्राच्या धाकाने चंदनाच्या झाडाचा बुंधा पळवून नेला. घरमालकांनी प्रतिकार केला असता तर काय झाले असते याची केवळ कल्पनाच करता येईल! पोलिस किती ठिकाणी पुरे पडणार, असा युक्तीवाद अनेकदा पुढे येतो. मात्र, एकाच रस्त्यावर एकाच चौकात वाहतूक पोलिस गटाने का थांबतात, याचे उत्तर मात्र असमर्थनीय युक्तीवाद पुढे करणार्‍यांकडे नसते. त्याचे उत्तर कुठल्याही पुणेकरांना विचारल्यावर लगेच मिळू शकेल. हडपसर घटनेतील चार आरोपींपैकी तिघे अल्पवयीन आहेत. कोयता गँग, हा अलीकडे पुण्याला झालेला कर्करोग. यामध्ये देखील अल्पवयीन मुलांची संख्या लक्षणीय आहे. पालक मंत्र्यांपासून अनेक ज्येष्ठांनी कोयता गँगचा समूळ नायनाट करण्याच्या घोषणा केल्या. त्या अद्याप घोषणा स्वरूपातच आहेत. सर्वसामान्य पुणेकर हताश आणि अगतिक झाला आहे. घरातून बाहेर पडल्यावर सुरक्षित घरात येईपर्यंत त्याच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची नुकतीच हत्या झाली. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असला तरी टोळ्यांमधील वर्चस्ववादाचे कारण नाकारण्यात आलेले नाही. याआधी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या झाली. सर्वसामान्यांचे नीतीधैर्य वाढविण्याऐवजी गुन्हेगारांचे नीतीधैर्य वाढविण्यासाठी यंत्रणा तत्पर आहेत. जबाबदार मंत्र्याने गुंडाकडून हार-तुरे स्वीकारणे, हा त्याचाच भाग. मग पोलिसांनी वचक बसवण्यासाठी गुंडांची परेड बोलाविली किंवा आणखी उपाय केले तर त्याचा उपयोग होत नसतो. पोलिस अधिकार्‍यावर शस्त्राने वार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल पोहोचली आहे. शिक्षण, उद्योग आणि सांस्कृतिक चळवळींचे केंद्र असलेले पुणे गुन्हेगारांचा उच्छाद आणि यंत्रणांच्या उदासीनतेमुळे, अकार्यक्षमतेमुळे भयाच्या सावटाखाली आहे. बेसुमार वाढलेली लोकसंख्या, बेरोजगारी, पुण्यात प्रचंड प्रमाणात झालेले स्थलांतर, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे पुणे बकाल झाले. गुन्हेगारी वाढली; मात्र ती रोखण्यासाठी कठोर पावले उचलली गेल्याचे दिसत नाही. तेच खरे दुखणे आहे.
 

Related Articles