E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
शिक्षक : समाज व राष्ट्राच्या भविष्याचा निर्माता
Samruddhi Dhayagude
04 Sep 2024
ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे
आपली भारतीय परंपरा, संस्कृती ही सातत्याने कृतज्ञता व्यक्त करणारी आहे. ज्यांनी आपल्या समाज व राष्ट्र निर्मितीसाठी निरपेक्षतेने कार्यरत राहून, त्याग करत योगदान दिले आहे त्यांच्याबद्दलचे सातत्याने ऋण मान्य केले आहे. समाजात अलीकडे कृतघ्नता वाढत चालली आहे असे दिसत असले तरी वर्तमानात शिक्षकी पेशाविषयी कृतज्ञतेची वाट चालली जात आहे. समाज व राष्ट्राच्या विकासाकरिता शाळा, महाविद्यालये निर्माण केली आहेत. तेथे कार्यरत असलेल्या शिक्षकी पेशाला स्वीकारलेल्या शिक्षकांना सरकार वेतन देत असले तरी ते काही सरकारी नोकर नाहीत, तर राष्ट्रनिर्माते आहेत हे लक्षात घ्यायला हवे.
शिक्षक हा समाज व राष्ट्राच्या दृष्टीने भविष्याचा निर्माता असतो. वर्गाच्या चार भिंतीच्या आत केल्या जाणार्या पेरणीतून उद्याचा समाज व राष्ट्र उभे राहत असते. त्यामुळे त्याने केलेली पेरणी हेच राष्ट्राचे खरे भविष्य असते. स्वप्न महासत्तेचे असू दे नाही, तर प्रगत राष्ट्राचे पूर्ण करण्याचा मार्ग शिक्षकांच्या अथक प्रयत्न आणि त्यांनी पेरलेल्या स्वप्नातूनच जातो हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे शिक्षक अधिक समृद्ध आणि ज्ञानसंपन्न असल्याशिवाय आपण प्रगती करू शकणार नाही. उद्याच्या शिक्षकदिनी त्यांचा सन्मान करण्याबरोबर त्यांच्या उन्नतीकरिता त्यांची सोबत करण्याची जबाबदारी समाज व राज्यकर्त्यांनी आपल्या मस्तकी घेण्याची गरज आहे. शिक्षकांना अवमानित करून महान राष्ट्राच्या दिशेने प्रवास करता येणे शक्य नाही. त्याचवेळी समाजमनात शिक्षकांच्या प्रति असलेला आदरभाव कमी का होतो आहे? याबद्दलही शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकानेच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे; मात्र शिक्षक जर ज्ञान समृद्धतेच्या वाटा चालणार नसतील, तर उद्याच्या समृद्ध आणि प्रगत भारताच्या दिशेने प्रवास करणे देखील शक्य होणार नाही.
शिक्षकी पेशात काम करणार्या प्रत्येकाची काही स्वप्ने असतात. स्वतःच्या भौतिक प्रगतीपेक्षा त्याला राष्ट्र विकासाच्या वाटा खुणावत असतात. कलाम म्हणत असत की, शिक्षकाला विद्यार्थीरूपी युवा शक्ती घडवायची आहे. तीच या पृथ्वीतलावरची मोठी संपत्ती आहे. शिक्षकीपेशात असलेला माणूस जितका श्रीमंत असतो तितका दुसरा कोणी श्रीमंत असण्याची शक्यता क्वचित असेल. अर्थात ही श्रीमंती आर्थिक नसते हेही लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक शिक्षकासाठी विद्यार्थी ही मोठी श्रीमंती आहे. विद्यार्थ्यांवर केले जाणारे संस्कार, त्यांच्या मस्तकात पेरली जाणारी स्वप्ने ही राष्ट्रसेवेइतकीच महत्त्वाची आहेत. नरेंद्र दत्त यांच्या आयुष्यात त्यांना अध्यापन करणारे प्राचार्य आले नसते, तर त्यांचा नरेंद्र दत्त ते विवेकानंद असा प्रवास सुरू झाला नसता.
समृद्धतेचा प्रवास
एक शिक्षक अनेकांचे आयुष्य समृद्ध करीत असतो. त्या समृद्धतेचा प्रवास हा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांचे प्राथमिक शाळेतील शिक्षक अब्दुल करीम यांचे ऋण व्यक्त करताना अत्यंत प्रेरक भावना व्यक्त केल्या आहेत. त्या वाचल्या की, या पेशाचे महत्त्व हृदयावर प्रतिबिंबीत झाल्याशिवाय राहत नाही. कलामांनी देखील म्हटले आहे, की त्यांच्या आयुष्यात फादर रेक्टर कलाथिल नावाचे शिक्षक आले होते. दर सोमवारी ते आईन्स्टाईन, गौतमबुद्ध, महात्मा गांधी, अब्राहम लिंकन यांचा जीवनप्रवास कथन करायचे. त्यातून जीवन घडविण्याचा प्रवास कथन करताना कोणते गुण जीवनात हवेत याची जाणीव व्हायची. त्यातून जीवनाची पाऊलवाट सुरू झाली. एक शिक्षक काय करतो, तर विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवत असतो. विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याकरिता त्याला विविध मार्गाने जावे लागते. तो मार्ग चालताना त्रास होईल; पण तो प्रवास अनुसरणे आवश्यक आहे, शिक्षकांना युवाशक्ती घडवायची आहे. ती युवा शक्तीच पृथ्वीतलावरची मोठी शक्ती आहे. ती शक्ती कोणत्या विचाराने घडविली जाते हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात शिक्षक विचाराची पेरणी कशी करतात त्यावर त्या शक्तीचे मार्गक्रमण करणे सुरू असते.
युवाशक्ती हीच राष्ट्र शक्ती आणि त्यांची जडणघडण हीच राष्ट्र भक्ती आहे. त्यांच्या मनात होणारी पेरणीच उद्याचे राष्ट्र घडविणारी असते. अलीकडे शाळा, महाविद्यालयांचे स्वरूप बदलत आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. त्यामुळे शिक्षणाच्या हेतुविषयी शंका घेतली जाऊ लागली आहे.जागतिकीकरणानंतरचे काही दुष्परिणाम शिक्षणावर देखील होताना दिसत आहे. त्यातून शिक्षण संस्थांचे आणि तेथे कार्यरत असलेल्या मनुष्यबळाचे असलेले स्थान हरवत चालले आहे. शिक्षणाचा बाजार झाल्याने होणारे नुकसान समाज व राष्ट्राला अजिबात परवडणारे असणार नाही.
शिक्षणाचा परिणाम
शिक्षणाचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. तो परिणाम म्हणजे बदल नाही, तर परिवर्तन असते. जीवनभर पुरते ते शिक्षण असते. त्यामुळे त्या शिक्षणातील पेरणी खूप महत्त्वाची आहे. कधीकाळी या देशाने उत्तम गुरूजी पाहिले आणि अनुभवले आहे. शिक्षकांनी पेरलेले स्वप्न आणि विचारांच्या जोरावर अनेकांचे आयुष्य पुढे गेले आहे. आज दिसणारा भारत अनेकांच्या योगदानातून उभा आहे; मात्र त्याचवेळी त्यांना घडविणारा शिक्षकही तितकाच महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवे. एकूणच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण असते. शिक्षकांच्या शिवाय आपल्याला जीवनात प्रगतीचे पंख लेऊन भरारी घेता येत नाही. त्यामुळे समाज व राष्ट्र विकासाच्या प्रक्रियेत शिक्षण महत्त्वाचे मानले जाते; मात्र त्याचवेळी समाजात शिक्षणाची धुरा वाहणारा शिक्षक अधिक महत्त्वाचा ठरत असतो.
शिक्षक या नात्याने माझे राष्ट्र उभारणीत महत्त्वाचे योगदान असायला हवे याचे सतत भान शिक्षक म्हणून असण्याची गरज आहे. शिक्षकी पेशा म्हणजे केवळ सरकारी नोकरी नाही. ते काम राष्ट्रनिर्मितीचे आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही समाजसेवेपेक्षा या पेशातील प्रामाणिकपणाने केलेले काम ही राष्ट्राची सर्वोत्तम व उत्तम समाजसेवा समजली जाते. त्यामुळे शिक्षक जे पेरतात ते समाज व राष्ट्राच्या भविष्यासाठी उगवत असते. राष्ट्राला लागणारे उत्तम मनुष्यबळ हे शिक्षणातून घडवले जात असते. ते उत्तम दर्जाचे मनुष्यबळ हे राष्ट्राच्या विकासात महत्वाचे मानले जाते. त्यामुळे केवळ वर्गात मी शिकवितो आणि परीक्षा घेतो एवढेत महत्वाचे नाही, तर उद्याच्या भारताची निर्मिती त्या चारभिंतीच्या आत केलेल्या पेरणीतून होत असते. कोठारी आयोगाने देखील या चारभिंतीचे मोल नमूद केले आहे. त्या चारभिंतीच्या आत आपण जे पेरणार असतो ते उगवते. त्यामुळे राष्ट्रउभारणीच्या कामात शिक्षकांचे स्थान अनन्य साधारण आहे. शिक्षक म्हणून काम करताना हे काम राष्ट्र उभारणीचे मानले तर हे मनुष्यबळाचा विचार किती गांभीर्याने करण्याची गरज आहे.
शिक्षकाला ज्ञानाची पेरणी करण्यासाठी लागणारी उत्तोमत्तोम विचाराचे बळ त्याला प्राप्त करावे लागेल. त्यासाठी शिक्षकांना पुस्तके वाचनाबरोबर समाज वाचावा लागेल. समाजाच्या उणिवांचा शोध घेत त्यावर मात करण्यासाठी शिक्षणातून पेरणी करावी लागणार आहे. त्यातून उद्यासाठी प्रकाशाची पेरणी करत शिक्षकांना प्रकाशाचे दूत बनावे लागेल. त्यांच्या ज्ञानप्रकाशानेच उद्याच्या अज्ञानाचा अंधकार नष्ट होणार आहे. त्यामुळे शिक्षक म्हणून स्वतःला सतत ज्ञानाची साधना करावी लागणार आहे. ज्ञानसाधना जो करत नाही, त्याला शिक्षक तरी कसे म्हणावे हा प्रश्न आहे.
विद्यार्थ्यांशी नाते
शिक्षक जीवनभर विद्यार्थ्यांशी नाते जपून असतात. त्यांच्यावर प्रेमाचा आणि ज्ञानाचा सतत वर्षाव करत असतात. विद्यार्थी शाळेत येताना स्वतःचे घर, माणसे सोडून आलेले असतात. ते आई-बाबांपासून दूर असतात. अनेकदा काही विद्यार्थी अनाथ असतात. काही आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करीत असतात. अशा विद्यार्थ्यांना समजावून घेणे, त्याच्याशी प्रेमाने वागणे हे शिक्षकाला करावेच लागते. शिकण्यासाठीचा पहिला धडा हा पुस्तक शिकविण्याचा नसून विद्यार्थ्यांवर प्रेम करणे, त्यांच्याशी नाते बांधण्याचा आहे. शिक्षक ती वाट सातत्याने चालत असतात. शिक्षणाच्या प्रक्रियेत कार्यरत असणार्याचा पहिला स्वभावधर्म प्रेम आणि जिव्हाळा हेच गुण आहेत. पूर्वी शिक्षकांना मास्तर असे म्हटले जायचे. या शब्दाची संधी केली असता असे लक्षात येते की, मा + स्तर म्हणजे आईच्या स्तरावरून जाऊन विद्यार्थ्यांना समजावून घेतो तो शिक्षक असतो. त्या अर्थाने आईचा स्तराचा अर्थच प्रेम आणि जिव्हाळा सामावलेला असणे असाच होतो. त्यामुळे जेथे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये जेथे प्रेम आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याचे काम शिक्षक करत असतो. शिक्षकी पेशाची जबाबदारी पेलताना शिक्षकांनाच अनेकदा बदलावे लागते. त्याला स्वतःला ही वाट कठीण वाटत असली तरी पेलावी लागते. शिक्षकाला माणूस म्हणून एका उंचीवर सतत उभे राहावे लागते. त्यामुळे इतर कोणी चुकला तर समाज मान्य करतो; मात्र शिक्षकांची थोडीशी चूकही समाजाला स्वीकारताना जड जात असते. शिक्षक हा संस्काराचा दूत असतो असे मानले जात असते. त्यामुळे शिक्षकाने केलेली थोडीशी चूकही समाज मान्य करत नाही.
प्रगतीच्या दिशेने
शिक्षकाला सतत सामाजिकदृष्ट्या भान ठेऊन काम करावे लागते. जबाबदारीची जाणीव सतत ठेवावी लागते. त्यांच्या प्रामाणिकतेच्या वाटेवरच पेशाची उंची अवलबूंन असते. आज शिक्षकीपेशाबद्दल चांगले बोलले जाते तसे वाईट बोलणार्यांची संख्याही वाढत आहे. वर्तमान पत्रापासून तर विधिमंडळापर्यंत एक नकारात्मक भावनेचे दर्शनही घडताना दिसते. त्या भावना शंभर टक्के खर्या नसतीलही पण, तरीसुद्धा जे बोलले जात आहे. त्या बाबतीत देखील विचार करण्याची गरज आहे. समाजात वाढत जाणार्या शिक्षकांच्या प्रतिमेच्या नकारात्मक भावनेच्या संदर्भाने आत्मपरीक्षणच करण्याची गरज अधोरेखित होऊ लागली आहे. ते आत्मपरीक्षणच शिक्षकी पेशाला योग्य उंचीवर घेऊन जाईल. शिक्षकी पेशातील प्रत्येक योग्य पाऊल देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे ठरेल यात शंका नाही. त्यामुळे या विचाराने आपला प्रवास सुरू ठेवला तर समृद्धतेची वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकी पेशाची हरवलेली प्रतिष्ठा, सन्मान आणि प्रतिमा पुन्हा प्राप्त करता येईल. शिक्षक हा पुन्हा राष्ट्रनिर्माता ठरेल. प्रत्येक दिवशी अध्ययन, अध्यापन, मूल्यमापनाच्या पलीकडे जात शिक्षणाची वाट आनंदी करण्यासाठी कार्यरत राहणे अधिक महत्त्वाचे आहे. शिक्षणाच्या प्रत्येक गोष्टीत आनंद मिळवत राहणे. रोज नव्या ज्ञानाचा वाटा चालत राहणे, स्वतःच्या समृद्धतेसाठी सातत्याने प्रयत्न करत राहणे घडत गेले, तर जीवनाची उंची गाठणे अशक्य नाही.
आज समाजात शिक्षकांच्या प्रति राज्यकर्ते कृतज्ञता व्यक्त करतील. गौरव करतील; पण त्या कौतुकाच्या पलीकडे शिक्षकाच्या स्वतःच्या आत प्रेरणेची ज्योत प्रज्वलित करावी लागणार आहे. शिक्षकाने जीवनभर फक्त मुलांच्या मनात प्रेरणा भरण्याचे काम करायला हवेच; पण त्याचवेळी विवेक आणि शहाणपणाची देखील गरज आहे. आज आपल्या शिक्षणातून माणूस घडवण्याचा विचार हरवत चालला आहे. शिक्षण घेतलेली माणसे अधिक वाईट, भ्रष्ट वागत असतील लोकांचा शिक्षणावरील विश्वास उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षणावरील विश्वास वृध्दिंगत करण्यासाठी शिक्षक म्हणून सतत प्रयत्न करण्याची गरज आहे. शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त न करणार्या समजालाही तसे भविष्य नसते. शिक्षक हाच समाज व राष्ट्राचा निर्माता असणार असेल, तर त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. केवळ एक दिवस आपण उत्सव करून त्यांच्या समर्पणाकडे जर दुर्लक्ष केले, तर त्याचे परिणाम निश्चित भोगावे लागतील हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे एक दिवसाची कृतज्ञता नको, तर सातत्याने समर्पणाचा सन्मान आणि आदर करायला हवा.
Related
Articles
गणेशोत्सवात प्रसाद वाटपावर ’एफडीए’ची करडी नजर
09 Sep 2024
मृत्यूच्या कारणांची कागदपत्रे का नाहीत?
10 Sep 2024
भारतीय संघ चेन्नईत दाखल
14 Sep 2024
वक्फ बोर्ड विधेयकामागे राजकीय हेतु
09 Sep 2024
नियंत्रणहीन ‘नियामक’?(अग्रलेख)
09 Sep 2024
भारत-चीनमध्ये नागरी विमान वाहतूक सहकार्यावर चर्चा
13 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
हवामानातील बदल, बदलते मनही !