‘सेबी’ प्रमुखांच्या अडचणीत वाढ   

वृत्तवेध 

‘सेबी’च्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर ‘हिंडेनबर्ग’ने केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. सार्वजनिक दस्तावेजात बुच यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात सल्लागार कंपनीकडून कमाई केल्याचे दिसून येते.‘सेबी’च्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. नियामक प्राधिकरणांसाठी असलेल्या नियमांचे त्यांनी उल्लंघन केल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने त्यांच्यावर अदानी समूहाशी संबंधित बाबींमध्ये हितसंबंधांचा संघर्ष असल्याचा आरोप केला आहे. या संशोधन अहवालात दावा करण्यात आला आहे की, अदानी समूहाच्या तपासादरम्यान बुच यांच्या पूर्वीच्या गुंतवणुकीमुळे त्यांच्या निर्णयांवर परिणाम झाला असावा. त्याला उत्तर देताना बुच यांनी आरोपांना चारित्र्य हत्या असे संबोधले आणि हितसंबंधांचे दावे फेटाळून लावले. अ‍ॅगोरा अ‍ॅडव्हाईझरी या सल्लागार कंपनीत बुच यांचा ९९ टक्के हिस्सा आहे. २०१७ ते २०२२ पर्यंत त्यांनी ३.७१ कोटी रुपयांची कमाई केली. हे ‘सेबी’च्या २००८ च्या धोरणाचे उल्लंघन करणारे आहे. बुच यांनी आपल्या पतीसाठी ही फर्म तयार केली. २०१९ मध्ये युनिलिव्हरमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी फर्म ताब्यात घेतली.
 
माजी वित्त सचिव आणि ‘सेबी’च्या नियामक मंडळाचे सदस्य सुभाषचंद्र गर्ग यांनी या प्रकरणाचे वर्णन ‘अत्यंत गंभीर’ या शब्दांमध्ये केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बुच यांनी ‘सेबी’च्या संचालक मंडळात सहभागी झाल्यानंतर फर्ममधील आपला हिस्सा कायम ठेवणे चुकीचे होते. असे असूनही, त्यांनी आपल्याला या फर्ममध्ये भागभांडवल ठेवण्याची परवानगी आहे की नाही हे स्पष्ट केले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कन्सल्टन्सी फर्मच्या कमाईचा अदानी समूहाशी संबंध असल्याचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत; मात्र बुच यांच्यावरील आरोपांमुळे ‘सेबी’च्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. या घटनांवरून ‘सेबी’ प्रमुखांच्या या वादग्रस्त प्रकरणामुळे भारतीय शेअर बाजार नियामकाच्या निःपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे हे स्पष्ट झाले आहे.

Related Articles