महायुतीतील विसंवाद (अग्रलेख)   

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा फायदा झाला नाही, असा सूर भाजपमधून उमटत असून महायुतीचे सूर विसंवादी झाले आहेत. त्यातच शिंदे गटाकडूनही अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षही लक्ष्य करण्यात येत असल्याने त्यांची कोंडी झाली आहे.
 
महायुतीचे जागावाटप दहा दिवसांत पूर्ण होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात १७३ जागांवर एकमत झाले. उर्वरित ११५ जागांवर लवकरच मतैक्य होईल; मात्र प्रत्यक्षात महायुतीत धुसफूस वाढली आहे. विशेषतः भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, असा सामना रंगताना दिसत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, याऐवजी सत्ताधार्‍यांमध्येच सुरु झालेल्या लढाईमुळे नकारात्मक संदेश गेला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानावरून महायुतीत वादाला सुरुवात झाली. ‘आपण कट्टर शिवसैनिक आहोत. आज राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की, उलट्या होतात’ अशा शब्दांत सावंत यांनी अजित पवार यांना डिवचले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने संतप्त होत सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली खरी; पण ती पूर्ण होण्याची अजिबात शक्यता नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत यांना दुखावले जाणार नाही. अजित पवार यांच्यासाठी भाजप देखील शिंदे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार नाही. घटक पक्ष दुखावतील अशी वक्तव्ये करु नयेत, अशी अपेक्षा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून व्यक्त झाली असली तरी त्या अपेक्षेला जुमानले जाईल, असे वाटत नाही. समज देण्यावर आतातरी सावंत यांच्या विधानाचा विषय गुंडाळण्यात आला आहे; पण याचे परिणाम निवडणुकीत दिसणार नाहीत, असे मानणे चुकीचे ठरेल.

शरद पवारांना प्रत्युत्तर

अजित पवार यांच्या अहमदनगरमधील कार्यक्रमात फलकांवर ‘माझी लाडकी बहीण’ असा उल्लेख होता, पण ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वगळण्यात आला होता! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधात गेल्यास सरकारला धोका पोहोचू नये यासाठी अजित पवारांना सोबत घेतले, असे समर्थन भाजपकडून केले गेले. प्रत्यक्षात ती कृती उद्धव यांना मुख्यमंत्री करुन युतीला सत्तेपासून दूर ठेवणार्‍या शरद पवारांना उत्तर देण्यासाठी होती. त्या खेळीचा भाजपला फायदा होण्याऐवजी तोटाच झाल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा फायदा झाला नाही, असा सूर भाजपमधून उमटत असून महायुतीचे सूर विसंवादी झाले आहेत. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर अजित पवार यांनी माफी मागितली. बारामतीत बहिणीविरुद्ध पत्नीला उभे करण्यात चूक झाली, असे काही दिवसांपूर्वी ते म्हणाले. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मान यात्रा सध्या सुरु आहे. पक्षातील नेते, कार्यकर्ते यांच्यातील अस्वस्थता दूर करण्याचे आव्हान अजित पवारांवर आहे. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या भूमिकेतून त्याच अस्वस्थतेचे दर्शन घडले. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर रामराजे यांनी टीका करीत, ‘तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही’, असे जाहीरपणे सांगून टाकले. दुसर्‍या बाजूला शिंदे यांच्या शिवसेनेतही अस्वस्थता आहे. भाजपने ‘मिशन १२५’ डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंत्रणेला बरोबर घेण्याची पावले पडत आहेत. मुख्यमंत्री पद आज शिवसेनेकडे आहे; पण नंतर काय? हाच शिंदे यांच्या शिवसेनेतील अस्वस्थतेचा मुद्दा. ‘मिशन १२५’ प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपला किमान १६० जागांवर लढण्याची इच्छा आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किमान ८० जागा हव्या आहेत. अशा वेळी अजित पवार गटासाठी केवळ ४८ जागा उरतात. हा पेच सोडविणे सोपे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री यांची नागपुरात जागा वाटपाबाबत बैठक झाली असली तरी महायुतीसमोर सुरळीत जागा वाटपाचे आव्हान कायम आहे. त्या-त्या मतदार संघात जिंकून येण्याची क्षमता ज्याच्याकडे त्या पक्षाला जागा, असे सूत्र भाजपकडून सांगितले जाते; पण जिंकून येण्यासाठी त्या-त्या ठिकाणी सक्षम कोण? हे भाजप आणि त्यांचे पाहणी अहवाल ठरविणार? की युतीमधील घटक पक्षांनाही ती मुभा राहणार, यावर बरेच अवलंबून आहे. 
 

Related Articles