E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
वासनांधांना तोंड द्यायचे तर..
Samruddhi Dhayagude
02 Sep 2024
डॉ राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ज्ञ)
कोलकात किंवा बदलापूर, तेथे घडलेल्या घटना सुन्न करणार्या आहेत.असे घडू नये यासाठी लहान मुली व मुले,तरुणी यांना आपल्या अवती भवती जागरुकपणे पाहण्यास शिकवले पाहिजे .आणि घरातील मुले व पुरुष यांचा मेंदूही योग्य वर्तणुकीसाठी ‘ट्रेन’करणे आवश्यक आहे. तसे घडले तरच विकृत प्रकारांचे प्रमाण घटू शकेल.
कोलकात्याच्या आर. जी. कार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कार व हत्या , २०१२ मधली निर्भयाची हत्या, २०१७ मधली उन्नावचे प्रकरण , २०१९ मधील हैदराबादची घटना असो किंवा नुकताच समोर आलेला दोन चिमुकल्यांवर घडलेला विकृत अत्याचार असो, दिवसेंदिवस अत्याचाराला बळी पडणार्या ‘निर्भयांची’ संख्या वाढत आहे. कसलीही भीती, कोणतीही लाज, किंचितही शरम न बाळगता निष्पाप स्त्रियांवर केल्या जाणार्या बलात्काराच्या आणि अत्याचाराच्या घटना नित्य वाढतच आहेत. हे अत्याचार ज्यांच्यावर होतात, ती फक्त‘ स्त्री’आहे एवढेच या रानटी नराधमांसाठी पुरेसे आहे. सहा महिन्यांच्या कोवळ्या बालिकेपासून कुणीही स्त्री-मुलगी आज या विकृतीला बळी पडू शकते.
हे असे काही घडले की झोपलेला समाज जागा होतो. मान्यवर व्यक्ती, विचारवंत निषेध व्यक्त करतात. विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरतात. सरकारकडून चौकशीचे आश्वासन दिले जाते. समित्या स्थापन होतात.कधी जनतेच्या भावनांचा उद्रेक होतो. संप, मोर्चे काढले जातात. रस्ते अडवले जातात. रेल्वे आणि वाहतूक बंद पाडली जाते. रुग्णालयांवर हल्ले होतात. पोलिसांवर हल्ले होतात. नासधूस केली जाते. कधी या भावना शांतपणे व्यक्त केल्या जातात. मेणबत्त्या लावल्या जातात. समाजमाध्यमांवर कॉमेंट केल्या जातात. डीपी ब्लॅक केले जातात. कोर्ट खटले दाखल होतात.
असे वाटू लागते, निदान या वेळी तरी सारे जागे झाले आहेत. आता सगळे झटून कामाला लागतील. पुन्हा अशा वाईट घटना होणार नाहीत, निदान त्यांचे प्रमाण अत्यल्प असेल अशी भाबडी आशा बाळगली जाते आणि मग तो धुरळा खाली बसतो. घडलेले अत्याचार लोक विसरतात असे नव्हे, पण त्याची तीव्रता कमी होते. हळूहळू अशा प्रकारांमध्ये सोसणारे कुटुंबच ते दु:ख सोसत राहते. कधी तरी खूप वर्षांनंतर एक चार ओळींची बातमी येते. ‘तो’ एक तर सुटतो नाही तर शिक्षा भोगून नव्याने अपराध करायला सज्ज होतो.
का घडते असे? मुळात स्त्रीकडे अशा गलिच्छ नजरेने पाहण्याची, बलात्कार आणि अत्याचार करण्याची आणि त्याहूनही भयंकर म्हणजे त्या स्त्रीचे हालहाल करून मारून टाकण्याची ही विकृत मानसिकता येते कुठून? बरेचदा हे विकृत वर्तन करणारे जवळचेच कुणी असतात. कधी शाळेतले ‘काठीवाले दादा’ असतात. स्कूलबस चालवणारे ‘ काका’ असतात. कुणी शिक्षक, प्रोफेसर, काका, मामा असतात किंवा मग जवळचे मित्र असतात. रोज भेटणारे, घरी येणारे परिचितही यात असतात. तरीही त्यांच्या वासनेच्या भुकेत आपल्याच मुलींना आणि बहिणींना जाळण्याची ही हिंमत त्यांच्यात येते कशी? इतकी क्रौर्य, इतकी विकृती निर्माणच कशी होऊ शकते, याचा गांभिर्याने विचार करण्याचीच ही वेळ आहे. अर्थात या केवळ बाहेर घडलेल्या आणि माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत आलेल्या घटना आहेत. हिमनगाचे केवळ टोक दिसते आणि बहुतांश भाग पाण्याखालीच असतो, तसेच उघड न होणार्या अशा घटनांचे प्रमाण आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढे आहे.
मानसशास्त्राच्या दृष्टीने अशी कृत्ये करणारे लोक ‘इंपल्स’ म्हणजे सणकेच्या आहारी जातात. एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा होते तेव्हा अशा लोकांचा मेंदू केवळ त्या आणि त्याच इच्छेने भारून जातो. योग्य-अयोग्य, जागा, वेळ, वय या सगळ्या बाबी लक्षात घेण्यासाठी अपेक्षित असलेल्या विवेकाला पूर्णपणे छेद देणारी ही सणक असते. जे घडते ते त्या सणकेमध्येच. त्यावर त्यांचे नियंत्रण उरलेले नसते. ती सणक या लोकांना आवरता येत नाही.
सर्वसामान्य व्यक्ती इच्छेच्या आहारी जात नाही. तिची विचारशक्ती जागृत असते. भय, भीती, लाज, चिंता या गोष्टीची बंधने त्या व्यक्तीला गैरवर्तन करू देत नाहीत. जसे विंडो शॉपिंग करणारी व्यक्ती कितीही हवेसे वाटले तरी काचा फोडून दागिने, कपडे, वस्तु घेत नाही. पण काही व्यक्ती तसे करतात. त्यांच्या दाबून टाकलेल्या भावनांची सणक उसळून वर येते आणि त्यांना ती नियंत्रित करता येत नाही.
मेंदू हा एखाद्या नव्या संगणकासारखा असतो. संस्कारांचे सॉफ्टवेअर बसवल्याशिवाय त्याला योग्य-अयोग्यतेची समज येऊ शकत नाही. इथे संस्कारांचे महत्त्व लक्षात येईल. दुर्देवाने, आपल्याकडे संस्कारविषयक कल्पना केवळ देवपूजा करणे आणि नमस्कार करणे इतपतच मर्यादित आहेत. दुसर्याला व्यक्ती म्हणून स्वीकारणे, त्याच्या इच्छेचा सन्मान करणे, मर्यादांचा आदर करणे, तिच्यावर अधिकार न गाजवणे हे आपल्याकडे शिकवले जात नाही. व्यक्तीवर आणि त्याच्या कृतीवर जरब बसवणार्या संस्था म्हणजे कायदा, समाज, पोलिस आणि न्यायालय. पण पैशाने, सत्तेने, गुंडगिरीने किंवा झुंडशाहीने आपण अशा संस्थांना गुंडाळून ठेवू शकतो, याची जाणीव झाली की अशी माणसे भीती आणि दडपण झुगारून देतात.
गुन्हेगारांना जरब बसण्यासाठी तातडीने कठोर शिक्षा देणे, हा देखील एक प्रकारचा ‘इम्पल्सिव्हनेस’ आहे. त्यामुळे सार्वजनिकरित्या कोणतीही चौकशी न करता फाशी द्या, त्याचे अवयव छाटून टाका अशा मागण्या करणेही गैरच आहे. त्यासाठी द्रुतगती न्यायालय,त्वरेने निर्णय , आणि शिक्षेची त्वरित अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यामुळे गुन्हेगारांना आणि गुन्हे करणार्यांना न्यायप्रक्रिया आणि शासनव्यवस्थेची जरब बसू शकेल.
आजही या गोष्टी सर्वांपर्यंत जाऊ नयेत, समाजात आपली बेअब्रू होऊ नये, असे पीडित कुटुंबाला वाटते. अशा घटना अनुभवणार्या कुटुंबाकडे पाहण्याची लोकांची, समाजाची नजर बदलते. एकदा का कोर्टाची पायरी चढली की मग तर सगळेच हातातून निसटून जाते. कोणताही अपराध नसताना माथी मारलेले दु:ख सहन करत राहणे एवढेच त्यांच्या हाती उरते.
यासाठी मुळातूनच मानसिकतेत बदल घडवण्याची आवश्यकता आहे. आपल्याशी गोड बोलणारा, वेळी-अवेळी घरापर्यंत पोचवायला येणारा, अभ्यासात मदत करणारा, आपला भाऊ, मित्र किंवा जवळचा नातेवाईक हा कधीही ‘विकृत पुरुष’ होऊ शकतो हे त्या तरुणीला कसे कळणार? ज्याच्या कडेवर बसून आपण फिरतो आहोत, जो आपल्याला बसमधून घरी सोडतो आहे, बोट धरून वॉशरूमला घेऊन जात आहे, त्याच्या मनातला ‘राक्षस’ आता जागा झाला आहे हे त्या चिमुकलीला तरी कसे कळणार? तर त्यासाठी आपण त्या चिमुकल्या मुलींना आणि विकृत व्यक्तींचे भक्ष्य बनू शकणार्या कोवळ्या लहान मुलांनादेखील जमेल तसे आणि जमेल तेवढे जागरूक करायला हवे. कुणी स्पर्श केला तर तो चांगला की वाईट हे तिला किंवा त्याला कळले पाहिजे. त्यांनी ते न घाबरता घरी सांगायला हवे.
यासाठी घराघरात चांगला संवाद असणे आवश्यक आहे. तरच घरातली स्त्री आणि ते कुटुंब त्या पीडित व्यक्तीला आधार देऊ शकेल. ‘हे विसरून जा. ‘असे घडले तर दुर्लक्ष करत जा’ किंवा ‘तुझीच काही तरी चूक असेल’ असे सांगून तिला गप्प बसवणे पूर्णत: चुकीचे आहे. मुली मोठ्या झाल्या की आपल्याच अवतीभवती जागरूकतेने पाहायला शिकवणे जरुरीचे आहे. समोरचा माणूस ओळखता यायला हवा. त्याची नजर तिला समजायला हवी. त्याचे इशारे तिच्या लक्षात यायला हवेत, इतकी चतुराई तिच्यात निर्माण करणेही आवश्यक आहे. मुळात स्त्रियांना या जाणीवा असतातच. त्या सिक्स्थ सेन्सच्या आधारावर त्यांनी अशा लोकांना टाळले, त्यांनी केलेल्या सूचनांकडे, आग्रहाकडे दुर्लक्ष केले तर योग्य उपाययोजना करुन काही अतिप्रसंग टळू शकतील.
अशा उपायांची सुरुवात घरापासून होते. त्यामुळे घरातल्या पुरुषाचा मेंदू योग्य रीतीने ‘ट्रेन’ करणे आणि त्याच्या मनात कुठे तरी खोल दडलेला इंपल्स योग्य संस्कारांनी नाहीसा आणि नियंत्रित करणे आवश्यक आहे. प्रत्येक घरात मुलीला आपल्याबरोबर काही गैर घडणार नाही यासाठी जागरूक करणे आणि दुर्देवाने तसे घडलेच तर ते मोकळेपणाने सांगता येण्याइतका सुसंवाद घरात असायला हवा.
(सौजन्य: संवेदन गुरुकुल)
Related
Articles
हरयानात भाजप पेचात (अग्रलेख)
12 Sep 2024
बांगलादेश मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
10 Sep 2024
व्हॉट्सऍप कट्टा
09 Sep 2024
अदानी समूह अडचणीत;३१० दशलक्ष डॉलर्स जप्त
14 Sep 2024
व्हॉट्सऍप कट्टा
09 Sep 2024
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
10 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
3
हवामानातील बदल, बदलते मनही !
4
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
5
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
6
काश्मीरमधील निवडणूक (अग्रलेख)