E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
छोटे पक्ष, मोठे प्रश्न!
Samruddhi Dhayagude
02 Sep 2024
राज्यरंग : भागा वरखडे
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने १६५ तर महायुतीने १२३ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली. या पार्श्वभूमीवर छोटे पक्ष तसेच अपक्ष निर्णायक भूमिका बजावू शकतात.आघाड्यांच्या कुरघोडीमध्ये मतांचे अंतर कमी राहून निवडून येणारे छोट्या पक्षांचे उमेदवार सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका बजावू शकतात.
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. १९८५ नंतर कोणत्याही एका राजकीय पक्षाला येथे बहुमत मिळाले नाही. १९९१ मध्ये तर अपक्षांची संख्या ३०च्या घरात होती. आता ३५ वर्षांनंतरही अपक्ष म्हणून निवडून येणार्यांची संख्या कमी झालेली नाही. त्या वेळी राज्यात तीनच प्रमुख राजकीय पक्ष होते. आता प्रमुख राजकीय पक्षांची संख्या दहा होऊनही अपक्ष आमदारांची संख्या कमी नाही. भारतीय जनता पक्ष, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतची अपक्ष आमदारांची संख्या लक्षात घेतल्यास त्यांचे महत्त्व लक्षात येते.
राजकीय पक्षांची भाऊगर्दी झाली असली, तरी त्यांच्यांशी बांधून न घेता सरकार आल्यानंतर सोयीस्कर भूमिका घेता यावी, म्हणून अपक्ष किंवा छोट्या आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा कल वाढला आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची खलबते करत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस या पक्षांनीही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुळवाजुळव सुरू केली. हरयाना आणि जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर तर महाराष्ट्रात सध्या सत्तेवर असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
या घडामोडी घडत असतानाच राज्यातील काही महत्त्वाच्या पण छोट्या पक्षांनी आपली वेगळी समीकरणे बनवण्यास प्रारंभ केला आहे. त्याकडे या प्रमुख राजकीय पक्षांना लक्ष द्यावे लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक प्रामुख्याने सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यामध्ये रंगणार असली, तरी काही छोट्या पक्षांची स्पर्धा या दोन्ही आघाड्यांना जाणवणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे घोषित केले आहे. त्यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. आतापर्यंत त्यांनी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा करतानाच त्यांनी मनसेच्या आमदारांना मंत्रिपदे देण्याबाबत केलेल्या भाषेवरून तर निवडणुकीनंतर कमी जागा असणार्यांच्या तराजूत वजन टाकून फायदा उचलण्याचा त्यांचा प्रयत्न जाणवतो आहे.
महायुतीला ज्यांच्या मैत्रीची अपेक्षा होती, त्या राज ठाकरे यांनी अशी भूमिका घेतली असतानाच महाविकास आघाडी किंवा ‘इंडिया’ आघाडीचा एक घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्षानेही स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. मुंबईतील सर्व ३६ जागा आम आदमी पक्ष स्वबळावर लढवणार असून महाराष्ट्रातील इतर जागांची चाचपणी त्यांनी सुरू केली आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनीही तिसर्या आघाडीचे सूतोवाच केले असून ‘एमआयएम’चे नेते इम्तियाज जलील आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याबरोबर बैठक घेतली आहे. शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर रविकांत तुपकर यांनीही स्वतंत्र चूल मांडली आहे. विधानसभेची निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांनी बुलढाणा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीमध्ये चांगली लढत दिली. एकीकडे तिसर्या आघाडीची बांधणी सुरू केली असताना त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
महाराष्ट्रातील आणखी एक चर्चेत असलेला पक्ष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी. त्यांनीही विधानसभेमध्ये स्वबळ आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. कडू, शेट्टी किंवा जलील यांनी आंबेडकर आपल्या आघाडीत सामील व्हावे अशा दृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहेत. या सर्व छोट्या पण महत्त्वाच्या पक्षांची अशा प्रकारे स्पर्धा निर्माण झाली असतानाच मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेले आंदोलक मनोज जरांगे यांनीसुद्धा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेण्याची घोषणा केली आहे.
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने ठराविक जागा न मिळाल्यास काही जागा लढवण्याचा इशारा दिला आहे. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर विधान परिषदेवर घेतले नसल्यामुळे या पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर नाराज आहेत. पालघर जिल्ह्यात हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी प्रभावी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये तिसर्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या या पक्षाचे पालघर जिल्ह्यात तीन आमदार आहेत. कधी महायुतीला तर कधी महाविकास आघाडीला ते पाठिंबा देतात. कोल्हापूरमध्ये विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष आहे. पूर्वी त्यांचे काँग्रेसशी संबंध होते. आता त्यांची नाळ महायुतीशी जुळली आहे. पूर्वी त्यांचे तीन-चार आमदार होते. कडू यांच्या प्रहार संघटनेचे तीन आमदार आहेत. त्यांनी पूर्वी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता, तर आता महायुतीसोबत आहेत. आता त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. राज्यात आंबेडकरी चळवळीची शकले झाली आहेत. त्यातील आठवले यांचा गट भाजपसोबत आहे. प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. राजेंद्र गवई कधी शरद पवार यांच्यासोबत असतात तर कधी काँग्रेससोबत. आता आनंद आंबेडकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीतील समाजवादी पक्षानेही मध्यंतरी १७ जागा लढवण्याचा इशारा दिला होता. राज्यातील प्रमुख सहा पक्ष दोन आघाड्यांमध्ये विभागले गेले आहेत. त्यांना निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
या छोट्या पक्षांमुळे आपले गणित कसे बिघडू शकते, याचा विचार सर्व मोठ्या पक्षांना करावा लागणार आहे. शिवसेनेच्या मतदारांवर अवलंबून असलेला राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो किंवा शहरी भागामध्ये काही प्रमाणात लोकप्रिय असलेला आम आदमी पक्ष असो किंवा ग्रामीण भागांमध्ये बर्यापैकी मतदारांचा पाया असलेली राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना किंवा मुस्लिम मतदारांमध्ये प्रभाव असलेला ‘एमआयएम’ असो किंवा प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष असो; हे सर्व छोटे पक्ष मतदानाची विभागणी कशा प्रकारे करतात, यावरच विधानसभा निवडणुकीचे निकाल अवलंबून राहणार आहेत. स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेणार्या या पक्षांना विधानसभा निवडणुकीमध्ये कितपत यश मिळेल, याबाबत शंका असली, तरी काही महत्त्वाच्या राजकीय पक्षांची विजयाची गणिते बिघडण्याचे काम हे पक्ष निश्चित करू शकतात. साहजिकच महायुती आणि महाविकास आघाडी सध्या एकमेकांना आपले स्पर्धक मानत असली तरी या दोन्ही आघाड्यांना या छोट्या राजकीय पक्षांची स्पर्धा लक्षात घ्यावी लागणार आहे. त्यांनी स्वबळ न आजमावता आपल्यासोबत यावे, म्हणून या आघाड्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत किंवा निवडणुकीमध्ये या राजकीय पक्षांची स्पर्धा जाणवणार नाही आणि आपले गणित विस्कटणार नाही, अशा प्रकारे वेगळी राजकीय रणनीती आखावी लागणार आहे. लोकसभेचा निकाल जाहीर होताच दोन आमदार असलेल्या समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीकडे ३५ जागांची मागणी केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १२ जागांची मागणी केली आहे. डहाणू, कळवणसह अन्य जागांसाठी त्यांचा आग्रह आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभव झाल्याने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना सांगोल्यासह काही जागा सोडण्याचा विचार महाविकास आघाडीला करावा लागणार आहे. शिवाजीनगर-मानखुर्दमुळे ईशान्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांना विजय मिळाला. भिवंडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुरेश म्हात्रे यांच्या विजयात भिवंडीतील समाजवादी पक्षाचा मोठा हातभार राहिला. यामुळेच या दोन मतदारसंघांबरोबरच आणखी काही मतदारसंघ मिळावेत, अशी समाजवादी पक्षाची मागणी आहे. एकंदरीत, विधानसभा निवडणुकीपूर्वी छोटे पक्ष तसेच अपक्ष आपली किंमत वसूल करायला सिध्द झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
Related
Articles
जबलपूर एस्प्रेसचे दोन डबे घसरले
08 Sep 2024
बाबा कल्याणी यांना पुरस्कार
15 Sep 2024
आग्र्याला वारसा शहर घोषित करता येणार नाही
14 Sep 2024
गणेश विसर्जन करताना पिता-पुत्राचा बुडून मृत्यू
14 Sep 2024
चैतन्यमय वातावरणात केसरीवाडा गणेशोत्सवास सुरुवात
08 Sep 2024
ऐतिहासिक व जिवंत देखावे पाहण्यासाठी गर्दी
14 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
हवामानातील बदल, बदलते मनही !