महागाई पासून दिलासा नाहीच   

अर्थनगरीतून : महेश देशपांडे 

चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत चीन कडून होणारी आयात वाढली तर निर्यात किरकोळ झाली.ही बातमी समोर येण्याच्या सुमारास अन्नधान्याच्या महागाईपासून जनतेला  दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे  समोर आले.  दरम्यान, ‘अमूल’ हा जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड बनल्याची बातमी पुढे आली.
 
अर्थ खात्याने  आपल्या मासिक आर्थिक आढाव्यात महागाई कमी होत असल्याचे म्हटले आहे, पण येत्या काही दिवसांमध्ये अन्नधान्य महागाईवाढीपासून कोणताही दिलासा मिळणार नाही, असे रिझर्व  बँकेनेच स्पष्ट केले आहे.  त्यामुळे अन्नधान्याच्या किमतींवरील दबावाचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन चलनविषयक धोरण ठेवावे लागेल असे बँकेचे मत आहे.
 
रिझर्व बँकेने चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या  इतिवृत्तानुसार   जुलैमध्ये खाद्यपदार्थांच्या किंमतींमध्ये वाढ झाली. मागील वर्षाच्या तुलनेत(‘बेस इफेक्ट’)मुळे किरकोळ महागाईवाढीचा दर  दुसर्‍या तिमाहीमध्ये कमी दिसू शकतो परंतु तिसर्‍या तिमाहीमध्ये महागाई वाढू शकते. लहरी  हवामानामुळे अन्नधान्य महागाई वाढण्याचा धोका आहे. जागतिक तणावामुळे खनिज तेलाच्या किमतीत चढ-उतार होत आहे. मोबाईलसेवेच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे महागाई वाढू शकते.देशांतर्गत   महागाई वाढीच्या शक्यतांमध्ये वाढ झाली असून ग्राहकांचा आत्मविश्वास कमी झाला आहे. बँकेच्या इतिवृत्तानुसार  परंतु अन्नधान्य महागाई कमी होताना दिसत नाही.  चांगला मॉन्सून आणि खरीप पिकांच्या पेरणीच्या क्षेत्रात  वाढ, जलसाठ्यामध्ये वाढ आणि रब्बी हंगामात चांगले उत्पादन होण्याचा अंदाज यामुळे अन्नधान्य महागाई कमी होण्याची आशा बँकेला आहे.

चीन मधून आयात वाढली

‘रिसर्च इन्स्टिट्यूट ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ (जीटीआरआय)ने आपल्या अहवालात म्हटले आहे की जानेवारी ते जून २०२४ दरम्यान देशाची  निर्यात ५.४१ टक्क्यांनी वाढून २३०.५१ अब्ज डॉलर झाली. जानेवारी-जून २०२४ दरम्यान चीनला केवळ ८.५ अब्ज डॉलरची निर्यात होती तर आयात ५०.१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली.  भारत २३९ देशांना उत्पादनांची निर्यात करतो आणि यापैकी १२६ देशांनी निर्यातीत सकारात्मक वाढ दर्शवली आहे. भारताच्या एकूण निर्यातीमध्ये या देशांचा वाटा ७५.३ टक्के आहे. निर्यातीमध्ये वाढ असणार्‍या प्रमुख देशांमध्ये अमेरिका, संयुक्त अरब अमिरात (यूएई), नेदरलँड, सिंगापूर आणि चीन यांचा समावेश आहे. तथापि, इटली, बेल्जियम, नेपाळ आणि हाँगकाँग या ९८ देशांमधील निर्यातीत घट झाली आहे.
 
जानेवारी-जून २०२३ मध्ये अमेरिकेला निर्यात ३७.७ अब्ज डॉलर होती. ती या वर्षाच्या याच कालावधीमध्ये १०.५ टक्क्यांनी वाढून ४१.६ अब्ज डॉलर झाली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये चीन हा भारताचा सर्वात मोठा आयातदार राहिला. चीनची आयात ४६.२ अब्ज डॉलरवरून ५०.१ अब्ज डॉलर झाली. ‘जीटीआरआय’चे संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले, ‘चीन आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताचा अव्वल व्यापार भागीदार राहिला; परंतु जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला. चीन दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून दुसर्‍या स्थानावर राहिला,  लोहखनिज, फार्मास्युटिकल्स, मौल्यवान खडे, बासमती तांदूळ, रसायने आणि स्मार्टफोन यासारख्या क्षेत्रांमुळे व्यापारी मालाच्या निर्यातीत वाढ झाली. सेवांच्या आघाडीवर निर्यात ६.९ टक्क्यांनी वाढून १७८.२ अब्ज डॉलर झाली तर आयात ५.७९ टक्क्यांनी वाढून ९५ अब्ज डॉलर झाली.

तेलबियांचे उत्पादन वाढणार?

खाद्य तेलासाठी इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तेलबियांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचा सरकारचा विचार आहे.  पिकांचे उत्पादन वाढवणे, लागवडीचे क्षेत्र वाढवणे आणि डायनॅमिक आयात शुल्क रचना लागू करण्याची योजना आहे. सरकार शेतकर्‍यांकडून मोहरी, सोयाबीन आणि भुईमूग यासारख्या तेलबिया किमान आधार किंमतीवर (एमएसपी)  खरेदी करण्याची व्यवस्था करत आहे. 
 
कृषी मंत्रालयाने तेलबिया, विशेषत: मोहरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि नायगर बियाणांची उत्पादकता वाढवण्यासाठी वीस राज्यांमधील ३४७ जिल्ह्यांमध्ये ६०० क्लस्टर्स निश्चित केले आहेत. एका अधिकार्‍याने सांगितले की उच्च उत्पादन देणार्‍या बियाण्यांच्या जाती आणि बियाणे केंद्रे आणि साठवण सुविधांच्या स्थापनेद्वारे आम्ही २०३० पर्यंत तेलबियांचे उत्पादन १३.५ क्विंटल/हेक्टरवरून २१.१ क्विंटल/हेक्टरपर्यंत वाढवण्याची आशा करतो. भारत हा खाद्य तेलाचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि सर्वात मोठा आयातदार आहे. आपल्या वार्षिक वापराच्या सुमारे ५८ टक्के गरजा आयातीद्वारे पूर्ण केल्या जातात. पुढील तीन ते चार वर्षांमध्ये देशांतर्गत वापर सुमारे ३० दशलक्ष टनांपर्यंत पोहोचू शकतो, असा व्यापारी सूत्रांचा अंदाज आहे.
 
आता एक खास बातमी. ‘अमूल’ने संपूर्ण जगात दबदबा निर्माण केला आहे. अमूल जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड बनला आहे. ‘अमूल’ ही खाद्य उत्पादने बनवणारी महाकाय कंपनी आहे. तिचे संपूर्ण देशभर वर्चस्व आहे. आता जगातही ‘अमूल’ने मान्यता मिळवली आहे. एका अहवालानुसार, ‘हे. ब्रँड फायनान्सच्या अहवालात याला एएए+ रेटिंग देण्यात आले आहे. कंपनीची ब्रँड व्हॅल्यूदेखील ३.३ अब्ज डॉलर झाली आहे. कंपनीने मागील वर्षी या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ‘हर्शे ’या अमेरिकन कंपनीला मागे टाकले. ‘अमूल’चा इतिहास जवळपास ७० वर्षांचा आहे.
 
ब्रँड फायनान्सच्या ‘ग्लोबल फूड अँड ड्रिंक्स रिपोर्ट, २०२४’ नुसार  ‘ब्रँड स्ट्रेंग्थ इंडेक्स’वर त्याचा स्कोअर १०० पैकी ९१ आहे. २०२३ च्या तुलनेत या वर्षी ‘अमूल’चे ब्रँड मूल्य ११ टक्क्यांनी वाढून ३.३ अब्ज डॉलर झाले आहे. ब्रँड मूल्याचा कंपनीच्या उलाढालीशी काहीही संबंध नाही. २०२२-२३ या आर्थिक वर्षात अमूलची विक्री १८.५ टक्क्यांनी वाढून ७२ हजार कोटी रुपये झाली आहे. ब्रँड फायनान्स अहवालात ‘अमूल’ला ‘हर्शे’ सोबत एएए+ रेटिंग देण्यात आले आहे; पण ‘हर्शे’चा ब्रँड व्हॅल्यू ०.५ टक्क्यांनी घसरून ३.९ अब्ज डॉलर झाला आहे. त्यामुळे त्याला यंदाच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दुग्ध व्यवसायात भारताच्या बाजारपेठेत ‘अमूल’चे मोठे नाव आहे. ‘अमूल’चा दूध बाजारात ७५ टक्के, लोणी बाजारात ८५ टक्के तर चीज मार्केटमध्ये ६६ टक्के वाटा आहे.
 
नेस्कॅफे  बनवणारा  ‘नेस्ले’ हा जगातील सर्वात मौल्यवान फूड ब्रँड म्हणून पुढे आला आहे. त्याचे बाजारमूल्य गेल्या वर्षीच्या तुलनेत ते सात टक्क्यांनी घसरले आहे. सध्या ते अंदाजे २०.८ अब्ज डॉलर आहे तर १२ अब्ज मूल्यांकनासह ‘लेज’ या यादीत दुसर्‍या स्थानावर आहे. नॉन-अल्कोहोलिक बेव्हरेज क्षेत्रात कोका-कोला पहिल्या क्रमांकावर तर पेप्सी दुसर्‍या क्रमांकावर आहे.    
 

Related Articles