मार्केट यार्डातील रस्त्यांची चाळण   

पहिल्याच पावसात दुरूस्तीचा खर्च पाण्यात; खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

पुणे : चार दिवसांच्या पावसात मार्केटयार्डातील भुसार विभागातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. या विभागात खरेदीसाठी वाहन घेवून येणार्‍यांना खड्ड्यांमुळे अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असून खड्ड्यांत रस्ता की रस्त्यात खड्डे असा प्रश्न प्रत्येकाला पडत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये बाजार समितीच्या तिजोरीतून खर्च केले जातात.  मात्र पहिल्याच पावसात दुरुस्तीचा सर्व खर्च पाण्यात गेला आहे. 
 
भुसार विभागात प्रवेश करण्यासाठी ७ ते ८ प्रवेशद्वार आहेत. तर मोठे ४ आडवे रस्ते आहेत. यातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. एकीकडे सातत्याने कोसळणारा पाऊस आणि दुसरीकडे खड्ड्यांतून मार्ग काढताना व्यापारी, खरेदीदार आणि कामगारांना अक्षरश: प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने, टेम्पो, ट्रक खड्ड्यांत जोरात आदळत आहेत. परिणामी त्याचा वाहन चालकांच्या मनयावर परिणाम होत आहे. तसेच अनेक दुचाकी खड्ड्यात चाक अकडकून पडत असल्याच्या घटना घडत आहेत. 
 
खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत आहेत. परिणामी विविध ठिकाणांहून माल घेवून येणार्‍या वाहनांना निश्चित स्थळी पोहचण्यास उशीर होत आहे. तसेच वाहतूक कोंडीत भर पडत आहे. खड्ड्यांमुळे पाणी उडत असल्याने भुसार विभागातील रस्त्याने पाणी चालणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे खड्ड्यांत वाहने जोरात आदळत असल्याने वाहनांचेही मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रस्त्यांवर वाढलेल्या खड्ड्यांमुळे अप्रत्यक्षपणे त्याचा व्यापारावर परिणाम होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. 

कोट्यवधी रूपये पाण्यात 

बाजार समितीकडून दरवर्षी बाजारातील रस्त्यांची दुरूस्ती केली जाते. त्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. मात्र बहुतांश दुरूस्ती केलेल्या रस्त्यांची पहिल्याच पावसात दूरावस्था होते. पावसाचे सातत्य कायम राहिल्यास रस्त्यांची अक्षरश: चाळण होते. दिवसेंदिवस खड्ड्यांचे साम्राज्य वाढत जाते. हा दरवर्षीचाच अनुभव आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील रस्त्यांच्या कामाचा दर्जा कधी सुधारणार असा प्रश्न बाजार घटकांकडून उपस्थित केला जात आहे. 

खड्डे बुजविण्याचे काम सुरू 

मागील आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे सध्या तात्पुरती  व्यवस्था तातडीने करण्यात येत आहे. सर्व खड्डे बुजविले जात आहेत. जे रस्ते दुरुस्त करायचे आहेत. त्या रस्त्याची प्रक्रिया सुरू आहे. 

 - डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती. 

Related Articles