E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)
Wrutuja pandharpure
05 Nov 2026
मध्यावधी निवडणुकीच्या निकालांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा दिला आहे. लोकप्रतिनिधी गृह व सिनेट या संसदेच्या दोन्ही सभागृहांत डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत निर्माण झाले आहे. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीवरचे सार्वमत अशा दृष्टीने या निवडणुकीकडे पाहिले जात होते. या निवडणुकीचे अंतिम निकाल काही दिवसांनी जाहीर होतील; मात्र जाहीर झालेले निकाल आणि कल बघता रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकन मतदारांनी ट्रम्प यांच्या हुकूमशाही वृत्तीस तडाखा दिला, हा या निकालाचा साधा अर्थ आहे. 2020 मध्ये ट्रम्प अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झाल्यावरही काही नागरिक त्यांना ’आपला अध्यक्ष’ मानत होते. आपल्या समर्थकांची ट्रम्प काळजी घेतील, असे त्यांना वाटत होते. आताचा कौल पूर्णपणे ट्रम्प यांच्या विरोधात आहे. रिपब्लिकन पक्षाच्या परंपरागत राज्यांत किंवा मतदार संघातही त्या पक्षाला पराभव पाहावा लागला आहे. मागील निवडणूक हरल्यानंतर अमेरिकन संसदेच्या इमारतीत घुसून धुडगूस घालण्यास ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना उघडपणे चिथावणी दिली होती; पण आताचा निकाल मान्य करून डेमोक्रॅटिक पक्षाबरोबर काम करण्याची ग्वाही देणे त्यांना भाग पडले आहे. तरी आपला ’अधिकार’ वापरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत बहुमत गमावले असले तरी ट्रम्प यांची खुमखुमी जिरलेली नाही. आपली धोरणे व निर्णय अंमलात आणण्यासाठी ’नकाराधिकार’ (व्हेटो) वापरण्याची धमकी त्यांनी दिली आहे.
त्रस्त सामान्यांचा कौल
बहुमतासह पुन्हा अध्यक्षपदी आल्यानंतर ट्रम्प यांची हुकूमशाही वृत्ती ठळकपणे समोर आली. त्यांच्या अनेक निर्णयांचे वर्णन ’मनमानी’ असे करावे लागेल. बडे भांडवलदार आणि आपला ’परिवार’ यांचे आर्थिक हित सांभाळणारे अध्यक्ष अशी गेल्या दोन वर्षांत त्यांची प्रतिमा निर्माण झाली. पाकिस्तानशी दुर्मिळ खनिजांचा व्यवहार, ’क्रिप्टो’ चलनातील व्यवहार, उद्योग समूहांवर दबाव आणणे किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘अतिबड्या’ उद्योगपतींना झुकते माप देणे, आपल्या वैयक्तिक उद्योगांची जास्त काळजी घेणे आदी प्रकारांमुळे अध्यक्षपदाच्या पहिल्या वर्षातच ट्रम्प यांची संपत्ती 2 अब्ज 20 कोटी डॉलर्सनी वाढली. अमेरिकेच्या इतिहासात कोणाही अध्यक्षास दिवसाला 60 लाख डॉलर्स मिळवणे शक्य झाले नव्हते. स्थलांतरितांचा ट्रम्प मनापासून द्वेष करतात. त्यांनी ’बेकायदा’ ठरवलेल्या स्थलांतरितांना हटवण्यासाठी प्रशासनाने वापरलेल्या पद्धती केवळ कठोर नव्हे, तर क्रूर होत्या. लहान मुले, महिला यांच्या मुसक्या कशा आवळल्या गेल्या ते जगाने पाहिले. मुस्लिम, कृष्णवर्णीय, भारतीय अशा सर्व वंशाच्या अनेकांची ट्रम्प यांनी अक्षरश: हकालपट्टी केली. अमेरिकन लोकशाही सर्वसमावेशक व सर्वांना समान मानणारी आहे. त्या तत्त्वाला ट्रम्प यांच्या वर्तनाने तडा गेल्याने असंख्य नागरिक संतापले. आपली शक्ती दाखवण्यासाठी ट्रम्प यांनी जगावर प्रत्युत्तर शुल्क लादल्याने अमेरिकेत काही वस्तूंची टंचाई निर्माण झाली व त्यांच्या किमतीही वाढल्या. इराणवर अकारण हल्ले करून त्यांनी अमेरिकेस महागाईच्या खाईत लोटले. इंधन, वीज, अन्न पदार्थ यांचे दर वाढल्याने सामान्य अमेरिकन नागरिकाचे रोजचे जगणे महाग झाले. संसद, शैक्षणिक संस्था, एवढेच नव्हे, तर न्याय व्यवस्थेवरही दबाव व नियंत्रण निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न हुकूमशहास साजेसे आहेत. विरोधी पक्षास व त्यांच्या नेत्यांना उद्देशून त्यांनी हीन भाषा वापरली. अमेरिकेस पुन्हा महान बनवण्याची त्यांची घोषणा असली तरी प्रत्यक्षात देशाची प्रतिमा जगात डागाळली. या बाबींनी सुजाण नागरिक दुखावला गेला. लोकप्रतिनिधी गृहात बहुमतासाठी 218 जागांची गरज असते, डेमोक्रॅटिक पक्षाने 228 जागा जिंकल्या आहेत व तो 241 पर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. सिनेटमध्ये बहुमतास 50 जागांची गरज असते, डेमोक्रॅटिक पक्षाने 54 जागा जिंकल्या आहेत. अनेक कृष्णवर्णीय उमेदवार जिंकले आहेत. अब्दुल एल सईद हा पहिला मुस्लिम सिनेटर ठरला आहे. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचा हिरिरीने प्रचार केला होता. केवळ महागाई, स्थलांतर या मुद्द्यांमुळे नव्हे, तर लोकशाही जपण्यासाठी अमेरिकन मतदारांनी ट्रम्प यांना नाकारले आहे हे महत्त्वाचे आहे.
Related
Articles
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
08 Nov 2026
बांगला देशात कामगारांचे आंदोलन पेटले
02 Nov 2026
अनमोल आणि तन्वीची दुसर्या फेरीत धडक
05 Nov 2026
असमर्थनीय मानसिकता (अग्रलेख)
04 Nov 2026
’कीर्तन’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण
04 Nov 2026
रियाध विमानतळावरील हल्ल्यात आणखी एका भारतीयाचा मृत्यू
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
वाचक लिहितात
4
नियम आणले का? (अग्रलेख)
5
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
6
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन