अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व   

 

मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना धक्का
 
वॉशिंग्टन : रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा आणि अमेरिकचे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांना दुसर्‍या कार्यकाळातील मध्यावधी निवडणुकीत जबर धक्का बसला आहे. प्रतिर्स्धी डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा धुव्वा उडवत सिनेट आणि लोकप्रतिनिधी गृहात वर्चस्व मिळविले. तसेच, गव्हर्नरपदाच्या निवडणुकीतही लक्षणीय यश मिळविले आहे. या मध्यावधी निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.
 
या निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकन सिनेटवरील नियंत्रण संपुष्टात आले असून, उर्वरित दोन वर्षांच्या कार्यकाळात ट्रम्प यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहणार आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी निकाल स्वीकारला असून, डेमोक्रॅटिक पक्षासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
 
ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला टेक्सास, जॉर्जिया, लोवा आणि ओहिओ यांसारख्या बालेकिल्यांत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या ठिकाणी गव्हर्नरपदे गमवावी लागली आहेत. टेक्सास, मायनी, दक्षिण आणि उत्तर कॅरोलिना, कॅन्सास, लोवा आणि ओहिओ येथील सिनेटच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.  
 
मध्यावधी निवडणुकीसाठी ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाचे सरकार असलेल्या २० राज्यांचा दौरा केला होता. मात्र, इराणबरोबरील संघर्ष, वाढती महागाई यावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्यामुळे मतदारांनी ट्रम्प यांना झिडकारले आहे.
 
लोकप्रतिनिधी गृहातील सर्व ४३५ आणि सिनेटमधील १०० पैकी ३७ जागा तसेच, ३६ राज्यांच्या गव्हर्नर पदासाठी नुकतेच मतदान पार पडले. या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. अखेरच्या वृत्तापर्यंत, लोकप्रतिनिधी गृहातील ४३५ पैकी ३४५ जागांचे निकाल जाहीर झाले होते. त्यापैकी, २२८ जागा डेमोक्रॅटिक पक्षाने पटकावल्या आहेत. 
 
लोकप्रतिनिधी गृहात बहुमतासाठी २१८ जागांची गरज असते. डेमोक्रॅटिक पक्षाने हा आकडा ओलांडला असून २४१ जागा त्यांच्या पारड्यात जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.सिनेटमध्ये बहुमतासाठी ५० जागांची गरज असते, डेमोक्रॅटिक पक्षाने ५४ जागा जिंकल्या असून, रिपब्लिकनला ४१ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे  चित्र आहे.
 
मध्यावधी निवडणुकीपूर्वी लोकप्रतिनिधी गृहात रिपब्लिकनचे २१८ आणि डेमोक्रॅटिकचे २१४ सदस्य होते. सध्याच्या आकडेवारीनुसार, रिपब्लिकनला फक्त १२६ जागा मिळाल्या असून ट्रम्प यांना सुमारे ९२ जागांचा फटका बसल्याचे चित्र आहे. तर, डेमोक्रॅटिकच्या पारड्यात २७ अधिकच्या जागा आल्या आहेत.
 
सिनेटमध्ये रिपब्लिकनची संख्या ५३ तर डेमोक्रॅटिकची संख्या ४७ होती. डेमोक्रॅटिकला चार अधिकच्या जागांची गरज होती. त्यांनी सात अधिकच्या जागा पटकावल्या. तर, रिपब्लिकने १२ जागांचा फटका बसला आहे. त्यांच्या जागा ५३ वरुन ४१ वर आल्या आहेत.
 

Related Articles