सेन्सेक्सची १,२०० अंकांनी उसळी   

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि परकीय गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरू झाल्यामुळे मंगळवारी सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसअखेर १,२२५.०७ अंकांनी वधारून ७६,९१७.८५ वर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय बाजाराचा निफ्टी ३७०.०५ अंकांनी वाढून २३,८१०.८५ वर बंद झाला. 
 
सेन्सेक्समधील ३० प्रमुख कंपन्यांपैकी हिंदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग तेजीत होते. तर, पॉवर ग्रिड, स्टेट बँक ऑफ इंडिया, एनटीपीसी, टाटा स्टील आणि ट्रेंट या कंपन्यांचे समभाग घसरले.
 
काल २,५१० कंपन्यांचे समभाग वाढले, १,८९५ कंपन्यांचे समभाग घसरले तर २०१ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर काल ०.७२ टक्क्यांनी घसरून प्रति पिंप १०५.६ डॉलर्सवर आले. दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील संघर्ष कतारच्या संघर्षामुळे संपण्याच्या दिशेने वाटचाल करत असून होर्मुझ सामुद्रधुनीतून ऊर्जा पुरवठा पूर्ववत होण्याची चिन्हे दिसत आहेत.सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३,११४.६८  कोटींचे समभाग खरेदी केले.
 
सलग तिसर्‍या दिवशी सोमवारी तेजी कायम राखत सेन्सेक्स १,२३३.२५ अंकांनी वधारून ७५,६९२.७८ वर बंद झाला होता. तर, निफ्टी ३८७.७० अंकांनी  वाढून २३,४४०.८० स्थिरावला होता. मागील चार दिवसांत सेन्सेक्समध्ये ३,६७१.८२ अंकांची (५ टक्क्यांची) वाढ झाली. तर निफ्टी १,११२ अंकांनी (४.८९ टक्क्यांनी) वाढला. 
 
आशियाई बाजारपेठांमध्ये दक्षिण कोरियाचा ’कोस्पी’ आणि शांघायचा ’एसएसई कंपोझिट’ निर्देशांक घसरणीसह बंद झाले. तर हाँगकाँगचा ’हँग सेंग’ निर्देशांक वाढीसह स्थिरावला. युरोपातील बाजारपेठा घसरणीसह व्यवहार करत होत्या. अमेरिकन शेअर बाजार सोमवारी घसरणीसह बंद झाला. 

Related Articles