आयडीबीआयच्या खासगीकरणाला विरोध   

पुणे : केंद्र सरकार आणि भारतीय जीवन वीमा निगम (एलआयसी) यांच्या कडून आयडीबीआय बँकेतील आपला नियंत्रण हिस्सा परदेशी नियंत्रित खाजगी कंपनीला विकण्याच्या निर्णयाविरोधात देशातील केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने आक्षेप घेतला आहे. सार्वजनिक मालकी आणि देशाचे आर्थिक सार्वभौमत्व टिकवण्यासाठी हे खाजगीकरण तातडीने थांबवावे, अशी आक्रमक मागणी या संघटनांनी केली आहे.
 
हे सरकार स्वदेशीचा पुरस्कार करते. मात्र आयडीबीआय ही बँक फेअरफॅक्स या विदेशी कंपनीला विकली जाते, हे आमच्या समजण्यापलीकडचे आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार कुठल्याही एका संस्थेला किंवा व्यक्तीला दोन बँकाचे मालक होता येत नाही. कारण त्यामुळे हितसंबंधामध्ये (कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) संघर्ष निर्माण होतो. याच फेअरफॅक्स समूहाने काही वर्षांपूर्वी केरळमधील कॅथॉलिक सिरियन बँक विकत घेतली होती. 
 
आता आयडीबीआयच्या खरेदीमुळे रिझर्व्ह बँकेच्या नियमाला तडा जात आहे. तसेच नियमांनुसार कुठल्या संस्थेला वा व्यक्तीला 40 टक्क्यांपेक्षा भागभांडवल विकत घेता येत नाही, मात्र येथे 50 टक्क्यांपेक्षा जास्त भाग खरेदी करण्यात येत आहे, असे ’युनायटेड फोरम ऑफ आयडीबीआय ऑफिसर्स अँड एम्प्लॉईज’ या संघटनेचे समन्वयक देवीदास तुळजापूरकर म्हणाले. 29 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ’बिजनेसवर्ल्ड’च्या अहवालाचा हवाला देत कामगार मंचाने आयडीबीआयच्या विक्री प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. या कथित अनियमिततेची चौकशी करण्यात यावी. तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयांचा क्रम, मूल्यमापन, निकषांमधील बदलाची कारणे आणि जनहित कसे संरक्षित केले गेले, हे जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी मागणी या संघटनांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 
 
प्रस्तावित खासगीकरण हे संविधानाच्या भावनेच्या आणि संसदेला दिलेल्या आश्‍वासनांच्या विरोधात असून बँक, कर्मचारी, भागधारक व राष्ट्र यांच्या हिताला बाधक आहे. ज्या जनतेच्या पैशातून बँकेचे पुनरुत्थान झाले, त्या जनतेला उत्तर देणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.  ’युनायटेड फोरम ऑफ आयडीबीआय ऑफिसर्स अँड एम्प्लॉईज’तर्फे पुकारण्यात आलेल्या संपाला केंद्रीय कामगार संघटनांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी पत्रकार परिषदेत शिरीष राणे, धनंजय कुलकर्णी, कृष्णा बरुरकर, देवीदास तुळजापूरकर उपस्थित होते.   

Related Articles