प्रवाशाच्या बेजबाबदार कृत्याने विमानातील प्रवाशांचा जीव धोक्यात   

आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न; प्रवासी तरूणावर गुन्हा 

पुणे : विमान प्रवास म्हणजे सुरक्षिततेची हमी आणि शिस्तीचे पालन करणे ही प्रत्येक प्रवाशाची जबाबदारी असते. मात्र, एका बेजबाबदार प्रवाशाने केलेल्या धोकादायक कृत्यामुळे विमानातील सर्वच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाल्याची घटना दिल्ली-पुणे विमान प्रवासादरम्यान घडली आहे. विमानातील आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करून या प्रवाशाने केवळ विमान कर्मचार्‍यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले नाही, तर विमानातील अन्य प्रवाशांच्या जीवितालाही संभाव्य धोका निर्माण केला. या गंभीर प्रकाराची दखल घेत विमानतळ पोलिसांनी संबंधित 33 वर्षीय प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
याप्रकरणी खासगी विमान कंपनीचे कर्मचारी ओंकार विनोद कुलकर्णी (वय-28) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सबंधित प्रवाशाविरुद्ध विमान अधिनियम कलम 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुण सासवड परिसरातील रहिवासी असून पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे. संबंधित तरुण सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दिल्लीहून पुण्याकडे येणार्‍या विमानातून प्रवास करीत होता. विमान प्रवास सुरू असतानाच त्याने विमानातील आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. विमान कर्मचार्‍यांची कोणतीही परवानगी न घेता त्याने केलेल्या या कृतीमुळे विमानातील सुरक्षाव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.
 
संवेदनशील यंत्रणेशी स्वत:हून छेडछाड 
 
विमान प्रवासात प्रत्येक प्रवाशाची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची असते. विमानातील आपत्कालीन दरवाजे हे विशेष सुरक्षा यंत्रणेचा भाग असतात. त्यांचा वापर केवळ आवश्यक आपत्कालीन परिस्थितीत आणि विमान कर्मचार्‍यांच्या निर्देशानुसारच केला जातो. अशा संवेदनशील यंत्रणेशी एखाद्या प्रवाशाने स्वतःहून छेडछाड करण्याचा किंवा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. 
 
इतरांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न 
 
एखाद्या प्रवाशाच्या बेजबाबदार वर्तनाचा परिणाम केवळ त्याच्यापुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचा फटका विमानातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अन्य सर्व प्रवाशांना बसू शकतो. विमानातील शेकडो प्रवाशांचा जीव विमानाच्या सुरक्षिततेवर अवलंबून असताना अशा प्रकारचे कृत्य म्हणजे इतरांच्या जीविताशी खेळण्याचाच प्रकार असल्याची भावना व्यक्त होत आहे. 

Related Articles