स्टोन क्रशरमुळे मावळमधील नऊ गावांचे आरोग्य धोक्यात   

प्रकल्प तात्काळ बंद करण्याचे आदेश

पुणे : मावळ तालुक्यातील आंबळे परिसरातील नऊ गावांमध्ये सुरू असलेल्या स्टोन क्रशर, डांबर प्रकल्प, आरएमसी प्रकल्प आणि खाण व्यवसायामुळे नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांना गंभीर आजार जडले असून आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर, ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन हे सर्व उद्योग कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून संबंधित विभागांकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी 15 ऑगस्ट 2020 आणि 9 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या ग्रामसभांमध्येही स्टोन क्रशर बंद करण्याचे ठराव करण्यात आले होते. मात्र, अद्याप परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नाही
 
प्रशासनाकडून तात्काळ कारवाईचे आश्‍वासन
 
ग्रामस्थांच्या तीव्र आंदोलनानंतर आणि 26 तारखेला केलेल्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अखेर हे प्रकल्प तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय सुरू असलेल्या सर्व बेकायदेशीर स्टोन क्रशर आणि प्रकल्पावर कायदेशीर व कठोर कारवाई करत ते बंद करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जर प्रशासनाने यात दिरंगाई केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
 
ग्रामसभेच्या ठरावाविना नियमांचे उल्लंघन करून स्टोन क्रशर सुरू
 
या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा करताना, ग्रामस्थांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा व नियमांचा दाखला दिला आहे. कायद्यानुसार, ज्या ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या ठरावामध्ये मंजुरी दिली असेल आणि ग्रामस्थांचे किंवा ग्रामपंचायतीचे अधिकृत अनुमती पत्र घेतले असेल, तरच असे उद्योग सुरू ठेवता येतात. मात्र, या परिसरातील एकाही स्टोन क्रशरला ग्रामसभेची किंवा ग्रामस्थांची कोणतीही परवानगी किंवा मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे किंवा अधिकार्‍यांना हाताशी धरून हे प्रकल्प थाटण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
 
उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आणि ग्रामसभेच्या ठरावाशिवाय हे स्टोन क्रशर चालवणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ग्रामसभेची मंजुरी किंवा लोकांचे अनुमती पत्र असल्याशिवाय हे व्यवसाय सुरू ठेवता येणार नाहीत. प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करून हे सर्व प्रकल्प कायमस्वरूपी बंद करावेत, अन्यथा आमचा लढा असाच सुरू राहील. 
- शांताराम कदम, उपसभापती, मावळ पंचायत समिती.

Related Articles