महापालिका परिसरात भेट वस्तू आणण्यास आणि वितरण करण्यास मनाई   

पुणे: दिवाळीच्या निमित्ताने ठेकेदार, विकासक आणि व्यावसायिकांकडून मिळणार्‍या भेटवस्तूंना महापालिका प्रशासनाने यंदा चाप लावला आहे. महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मिठाईचे बॉक्स, फराळाचे पदार्थ, ड्रायफ्रूट्स, गिफ्ट हॅम्पर्स, अथवा अन्य कोणत्याही स्वरूपातील भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर महापालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व विभागीय, क्षेत्रीय आणि उपकार्यालयांच्या परिसरात भेटवस्तू आणणे आणि त्यांचे वितरण करण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे.
 
दिवाळीच्या काळात महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना विविध ठेकेदार, विकासक, वास्तुविशारद, सल्लागार, पुरवठादार तसेच व्यावसायिकांकडून मिठाई, फराळ आणि अन्य भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. अनेकदा या भेटवस्तू वैयक्तिक स्वरूपात दिल्या जातात, तर काही वेळा कार्यालयांमध्येच त्यांचे वाटप केले जाते. मात्र, महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित कामे करणार्‍या ठेकेदारांकडून अशा भेटवस्तू स्वीकारल्यास प्रशासकीय निर्णयप्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. निविदा प्रक्रिया, कामांची मंजुरी, गुणवत्ता तपासणी आणि ठेकेदारांची देयके यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांवर अशा भेटवस्तूंचा अप्रत्यक्ष प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने यंदा स्पष्ट निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. 

Related Articles