भाजप अजूनही विरोधी पक्षाच्या मानसिकतेत   

राज यांचे टीकास्त्र

मुंबई, (प्रतिनिधी) : सत्तेवर बसल्यानंतरही भाजप अजून विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर पडलेला नाही, तर काँग्रेसला अजूनही विरोधी पक्षाची भूमिका कशी बजवायची हे समजलेले नाही. सत्ता केवळ खुर्चीत नसते, ती अंगात आणि मनातही असावी लागते. सत्ताधार्‍यांनी आपल्यावरील टीका आणि विनोद खिलाडूवृत्तीने स्वीकारायला शिकले पाहिजे. मात्र, आज व्यंगचित्रकार, पत्रकार आणि संपादकांवर बंधने आणली जात आहेत. हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याचा टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली. भाजपने लोकशाही वाचवा म्हणणे म्हणजे ‘केएफसी’च्या म्हातार्‍याने कोंबडी वाचवा म्हणण्यासारखे असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.
 
पु. ल. देशपांडे यांच्यावरील व्यंगचित्र दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यात राज बोलत होते. रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमात राज यांनी पु.ल.देशपांडे यांच्यासोबतच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. भाजपकडून राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्याच्या काढलेल्या ‘लोकशाही बचाव रॅली‘वर टीका करताना राज ठाकरे यांनी, भाजपने लोकशाही वाचवा असे म्हणणे ‘केएफसी’च्या म्हातार्‍याने कोंबड्या वाचवा असे सांगण्यासारखे आहे, असा टोला लगावला. स्वत:च सत्तेत बसलेले असताना लोकशाही वाचविण्यासाठी मोर्चे नेमके कशासाठी आणि कोणाविरुद्ध काढत आहात, असा सवालही राज यांनी केला. विधान परिषद निवडणुकांच्या निकालाचा अंदाज चुकल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटचा संदर्भ देत राज  म्हणाले, मी आजवर कोणत्याच पंतप्रधानांनी असे ट्विट केल्याचे पाहिलेले नाही. भाजप अजूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेतूनच बाहेर आलेला नाही. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय शैलीचाही दाखला दिला. 

Related Articles