दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍याची आत्महत्या   

सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना बोरुळ येथे घडली आहे. ऐन दिवाळी सण तोंडावर असताना एका ६५ वर्षीय शेतकर्‍याने आपली जीवनयात्रा संपवल्याने गावावर शोककळा पसरली आहे. सिद्धप्पा सोमनिंग मनुरे (वय ६५, रा. मौजे बोरुळ, ता. दक्षिण सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शेतकरी सिद्धप्पा मनुरे हे आपल्या शेतात गेले असता त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.या शेतकर्‍याची स्वतःच्या मालकीची सुमारे तीन एकर शेती असून, त्यांनी जवळपास २५ एकर शेती बटईने कसण्यासाठी घेतली होती. म्हणजे एकूण २८ एकर शेती ते कसत होते. यामध्ये सुमारे पाच एकर ऊस तसेच कापूस पिकाची लागवड केली होती. यासाठी त्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला होता.
 
मात्र, यावर्षीच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतीमध्ये केलेला लाखो रुपयांचा खर्च, वाढलेली आर्थिक अडचण आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ते काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यांच्या जाण्याने मनुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस करीत आहेत.

Related Articles