दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मातीच्या दिव्यांना मागणी   

भीमाशंकर, (वार्ताहर) : आंबेगाव तालुक्यात मातीची भांडी व कलाकुसरीच्या वस्तू बनवणारा कुंभार समाज आपल्या अंगभूत कौशल्याच्या जोरावर वर्षभरात येणार्‍या विविध सण-उत्सवांसाठी सुंदर वस्तूंची निर्मिती करत असतो. या वस्तूंना बाजारपेठेत नेहमीच मोठी मागणी असते. सध्या दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे, गुजरात आणि राजस्तानमधून आलेले मातीचे दिवे व छोट्या पणत्या खरेदी करण्यावर विशेष भर दिला जात आहे. आंबेगाव तालुक्यातील बाजारपेठांसमोरील मुख्य रस्त्यांवर यंदाही विक्रेत्यांनी दिव्यांची आकर्षक दुकाने थाटली आहेत.
 
मंचर, घोडेगाव, अवसरी, डिंभे आणि निरगुडसर इत्यादी बाजारपेठेत तसेच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मातीच्या दिव्यांची विक्री केली जात आहे. येथील दुकानांमध्ये २० रुपये डझनपासून ते ६० रुपये डझनापर्यंत मातीच्या विविध पणत्या आणि दिवाळी सेलिब्रेशनच्या इतर वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नक्षीदार डिझाइनच्या पणत्या, कमल दीप, आकर्षक झुंबर अशा सुमारे ३० प्रकारच्या आकर्षक मातीच्या पणत्या व अन्य वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मागील ५-६ वर्षांपासून राजस्तान, गुजरात आणि कलकत्ता येथून हा माल आणून आंबेगाव तालुक्यामध्ये विक्री केली जात आहे. सर्वसामान्य ग्राहकांना सहज परवडणारे दर असल्यामुळे या मातीच्या दिव्यांना आणि कलाकुसरीच्या वस्तूंना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. रस्त्यांवर थाटलेली ही मातीच्या पणत्यांची दुकाने नागरिकांना दिवाळी जवळ आल्याची आनंदी जाणीव करून देत आहेत. घरांसमोरील अंगण, तुलसीवृंदावन आणि मुख्य दरवाज्यावर दिव्यांची रोषणाई करण्यासाठी नागरिक आपल्या आवडीनुसार पणत्यांची खरेदी करत आहेत. सायंकाळच्या वेळी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी जमू लागली असून, जसजसा सण जवळ येईल, तसतसा दिव्यांचा खप आणखी वाढेल असा विश्वास विक्रेते सिद्धेश खेत्री, बिहारी परदेशी यांनी व्यक्त  केला आहे.
 

Related Articles