उजनी धरणातून सोडलेले पाणी माचणूर बंधार्‍यात पोहचले   

मंगळवेढा, (वार्ताहर) : उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी सोडण्यात आलेले पाणी आज मंगळवार रोजी माचनुर येथील को.प.बंधार्‍यात पोचले असून या पाण्यामुळे गेले दोन महिने नदी काठावरील  गावात पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर झाल्याने तो सुटण्यास मदत झाली आहे.यंदा जून महिन्यापासून ते सप्टेंबर अखेर पर्यंत पावसाची सर्वच नक्षत्र कोरडी ठणठणीत गेल्यामुळे नदी पात्रात  पाणी वाहिलेच नाही परिणामी नदीकाठावरील गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती चिमणीला प्यायला सुद्धा पाणी नदीपात्रामध्ये उपलब्ध नव्हते त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावाच्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी केवळ खास बाब म्हणून पिण्यासाठी हे पाणी सोडले आहे.
 
हे पाणी फक्त पिण्यासाठीच वापरता येणार असून नदी काठावरील गावातील वीजपुरवठा केवळ पाण्यासाठी दोन तास चालू ठेवण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत हे पाणी नागरिकांनी जपून वापरल्यास भविष्यात पाणीटंचाई उद्भवणार नाही मात्र पाण्याचा वारेमाप वापर केल्यास नदीपात्रातील पाणी संपून पुन्हा जलसंकट उद्भवणार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत भीमा नदी पात्रात वाळू उपशामुळे मोठाले खड्डे पडल्यामुळे व गेले दोन महिने नदीपात्र कोरडे ठणठणीत असल्यामुळे पाणी पुढे सरकण्यास खूपच विलंब लागत लागत आहे. पाण्याचा सोर्स कमी असल्यामुळे पाणी विलंबाने जात आहे मंगळवेढा  शहराला पाणीपुरवठा करणार्‍या उचेठाण को.प. बंधार्‍यात पाणीसाठा झाल्याने शहरावरील जनसंकट टळले आहे तालुक्याच्या दक्षिण भागात ४२ गावात पाण्याची टंचाई जानवत  असल्याने येथे टँकर सुरू करून लोकांच्या घशाची तहान भागवली जात असल्याचे सध्या चित्र आहे.

Related Articles