कर्जतमध्ये ज्योती शिंदे यांच्या विजयाने प्रस्थापितांना धक्का   

कर्जत, (वार्ताहर) : अहिल्यानगर जिल्ह्यामधील सेवा संस्थेमध्ये हाय व्होल्टेज लढत म्हणून कर्जतकडे पाहिले जाते. सहकारातील मातब्बर अशी ओळख असणारे अंबादास पिसाळ यांचे चिरंजीव तुषार पिसाळ व अतिशय सामान्य कुटुंबामधून नेतृत्व करणारे प्रकाश शिंदे यांच्या पत्नी ज्योती शिंदे यांच्यामध्ये ही लढत झाली. अतिशय अटीतटीची वाटणारी ही निवडणूक निकालानंतर मात्र पूर्णपणे एकतर्फीच झाल्याचे दिसून आली ज्योती प्रकाश शिंदे यांना ५४ तर तुषार अंबादास पिसाळ यांना वीस मते मिळाली.
 
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये कर्जत तालुक्यातून एवढ्या मोठ्या मताधिक्याने प्रथमच सेवा सोसायटीतून विजय मिळवत ज्योती प्रकाश शिंदे यांनी एक इतिहास घडवला. मात्र या विजयामध्ये विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांची रणनीती यशस्वी झाली. या निवडणुकीमध्ये त्यांनी कर्जत-जामखेडसह जिल्ह्यातील नेत्यांना आपण सहकारातील राजकारणामध्ये कुठेही कमी नसून छोट्या शिलेदारांना घेऊन मातब्बरांना धूळ चालू शकतो असा संदेश दिला आहे.
 
निवडणूक निकालानंतर दुपारी तीन वाजता ज्योती प्रकाश शिंदे यांची कर्जत शहरांमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समर्थकांनी मोठा जल्लोष केला. गुलालाची उधळण केली फटाके फोडून डीजेचा दणदणात यावेळी करण्यात आला. ग्रामदैवत गोधड महाराज मंदिरामध्ये जाऊन विजयी उमेदवारांनी व समर्थकांनी दर्शन घेतले यावेळी त्या ठिकाणी विजयी सभा संपन्न झाली. 
 
यावेळी बोलताना औदुंबर राजे निंबाळकर म्हणाले की, सामान्य कुटुंबातील ज्योती प्रकाश शिंदे यांना जिल्हा सहकारी बँकेची उमेदवारी देऊन त्यांना निवडून कर्जत तालुक्यामधून आणणे ही एवढी साधी सोपी गोष्ट नव्हती. मात्र प्राध्यापक राम शिंदे यांनी सर्व कार्यकर्ते आणि मतदार यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली. या निवडणुकीच्या निमित्ताने मतदार संघातील जनतेला प्राध्यापक राम शिंदे यांना फसवल्यावर काय होते याचा एक संदेश या दोन्हीही निकालामधून मिळाला आहे.
 
यावेळी बोलताना माझी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर म्हणाले की, प्राध्यापक राम शिंदे यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी केवळ दिली नाही तर त्यांना विजयी केले या विजयाचे सर्व श्रेय त्यांनाच आहे मात्र या निवडणुकीमध्ये काही पत्रक पुढारी टीका करत होते मात्र ते पत्रक बास ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी पराभव होतो हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
 

Related Articles