शिरपुंजेचा भैरवनाथ गड धार्मिक पर्यटनासह निसर्गप्रेमींचे आकर्षण   

अकोले (वार्ताहर) : सह्याद्रीच्या कुशीत आणि कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या सीमेवर वसलेला शिरपुंजेचा भैरवनाथ गड धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा संगम ठरत आहे. राजूरपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गडावर दर्शनासाठी हजारो भाविक, महिला आणि आबालवृद्ध उपस्थिती लावतात.
 
भैरवनाथ हे आदिवासी महादेव कोळी व ठाकर समाजाचे श्रद्धास्थान आणि अस्मितेचे प्रतीक आहे. दिवाळीपूर्वी नवीन भाताचा नैवेद्य प्रथम भैरवनाथाला अर्पण करण्याची परंपरा येथे आजही जपली जाते. तसेच केसांनी देवाची वाट झाडण्याचा अनोखा नवसविधीही भाविकांचे लक्ष वेधून घेतो.
 
गडावरील प्राचीन तटबंदी, कातळात कोरलेल्या पायर्‍या ऐतिहासिक वारशाची साक्ष देतात. येथून सह्याद्रीच्या डोंगररांगा, हिरवीगार शेती आणि घनदाट जंगलाचे विहंगम दर्शन घडते. वन विभागाने सुरक्षेसाठी रेलिंगची व्यवस्था केली आहे.
 
धार्मिक पर्यटनासोबतच इको-टुरिझम आणि दुर्गपर्यटनासाठी भैरवनाथ गडाला मोठी संधी आहे. भाविकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळून गडाचे पावित्र्य व पर्यावरण जपावे, असे आवाहन यात्रा कमिटी व वन विभागाने केले आहे.

Related Articles