अवकाळी पावसाचा भातशेतीला फटका; शेतकरी चिंतेत   

अवकाळी पावसाने मावळातील भातशेतीचे नुकसान

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) : मावळ तालुक्यात अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने कापणीस तयार असलेल्या खरीप भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने भात उत्पादक शेतकर्‍यांवर निराशेचे सावट पसरले आहे.
 
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्याच्या सर्वच भागांत अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. मावळ तालुका खरीप भात पिकाचे आगार म्हणून ओळखला जात असून, तालुक्यात सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. यंदा पावसाने सुरुवातीलाच ताण दिल्याने लागवडीस सुमारे महिनाभर उशीर झाला होता. मात्र, जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावून सुरुवातीची कसर भरून काढली. त्यामुळे भातपीक सावरून जोमात आले होते. यंदा भात पिकाला बर्‍यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होते.
 
मात्र, भाताच्या दाणे भरण्याच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने पुन्हा ताण दिल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या भातपीक काढणीस पूर्णपणे तयार असून, काही शेतकर्‍यांनी कापणीच्या कामाला सुरुवातही केली आहे. अशातच अवकाळी पावसाने अचानक तडाखा दिल्याने उभे भातपीक तसेच कापणी करून शेतात ठेवलेले पीक भिजले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या मेहनतीने पिकवलेल्या भाताचे नुकसान होत असून, शेतकर्‍यांवर दुःखाचे सावट आले आहे.
 
दरम्यान, मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी करत आहेत. काही भागांत पावसाचा जोर अधिक असल्याने उभ्या पिकांसह कापलेल्या भाताचेही नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी खाचरांमध्ये पाणी साचल्याने भाताचा पेंढा आणि जनावरांचा चारा भिजत आहे. त्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे.अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भागांतील उभ्या आणि कापलेल्या भात पिकाचे नुकसान होत असल्याचे सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी सांगितले.

Related Articles