जिल्हा बँकेवर विखे-थोरात-गडाखांचे निर्विवाद वर्चस्व; लंके, शिंदेंनीही दाखविली ताकद   

अहिल्यानगर : जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणातील सत्तासमीकरण स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि यशवंतराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास पॅनलने २१ पैकी १८ जागांवर विजय मिळवत बँकेवरील वर्चस्व कायम राखले. मात्र, पारनेरमध्ये खासदार निलेश लंके यांनी विखे समर्थकांचा पराभव केला, तर कर्जत-जामखेडमध्ये विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दोन जागांवर समर्थकांना विजयी करून आपली ताकद दाखवून दिली.
 
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी प्रयत्न केले होते. मात्र, नेत्यांमधील मतभेद आणि सहकारातील वर्चस्वाच्या लढाईमुळे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. प्रा. राम शिंदे यांनी स्वतंत्र भूमिका घेत कर्जत-जामखेडमध्ये उमेदवार उभे केले. जामखेडमधून सचिन घुमरे बिनविरोध निवडून आले, तर कर्जतमधून ज्योती शिंदे यांनी ५४ मते मिळवत तुषार पिसाळ (२० मते) यांचा पराभव केला.
 
खा. लंके यांचे वर्चस्व
 
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघातून खासदार लंके यांनी प्रतिस्पर्धी आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे गटाचे उमेदवार राहुल शिंदे यांचा पराभव केला. या लढतीत लंके यांनी सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेतली. लंके यांना ६४ मते मिळाली तर शिंदे यांना ४० मते मिळाली. पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघात एकूण १०४ मतदार होते.
 
आ. लहामटेंना मोठा धक्का
 
पारनेरपाठोपाठ अकोले सेवा सोसायटी मतदारसंघाच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. याठिकाणी माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या कन्या ज्योती शिंदे यांनी विद्यमान आमदार किरण लहामटे यांचा पराभव केला. ज्योती शिंदे ५६ मतांनी विजयी झाल्या तर आमदार किरण लहामटे यांना ३६ मते मिळाली आहे.
 
राम शिंदे यांनी गड राखला
 
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या निवडणुकीत कर्जत-जामखेडचा गड राखला. जामखेड सेवा सोसायटी मतदारसंघातून प्रा. शिंदे यांचे समर्थक सचिन घुमरे हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत तर कर्जत सेवा सोसायटी मतदारसंघात चुरशीची लढत झाली होती. याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कर्जत सोसायटी मतदारसंघात सभापती प्रा. राम शिंदे गटाच्या उमेदवार ज्योती शिंदे विजयी झाल्या. त्यांना ५४ मते मिळाली. शिंदे यांनी जिल्हा बँकेचे माजी संचालक अंबादास पिसाळ यांचे चिरंजीव तुषार पिसाळ यांचा पराभव केला. पिसाळ यांना २० मते मिळाली आहे. सभापती प्रा. राम शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेत आपल्या समर्थकांना मैदानात उतरविले होते. त्यामुळे या दोन्ही जागांवर त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
 
एकूणच जिल्हा बँकेच्या सत्तेवर विखे-थोरातांचे वर्चस्व कायम राहिले असले, तरी पारनेरमध्ये लंके आणि कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे यांनी आपापले राजकीय अस्तित्व ठळकपणे सिद्ध केले आहे. आता दुष्काळ, शेतकर्‍यांचे प्रश्न, थकीत कर्जे आणि बँकेतील आर्थिक शिस्त या आव्हानांना सामोरे जात नवनिर्वाचित संचालक मंडळाला आपली कामगिरी सिद्ध करावी लागणार आहे.
 
निवडणूक निकाल : सेवा सोसासटी मतदारसंघ-पारनेर-खा. निलेश लंके (६४ मते, विजयी) राहुल शिंदे (४० मते), अकोले-संजीवनी शिंदे (४९ मते, विजयी), आमदार किरण लहामटे (३६ मते), कर्जत-ज्योती शिंदे (५४ मते, विजयी), तुषार पिसाळ (२० मते), राहुरी-आ. प्राजक्त तनपुरे (८९ मते, विजयी), सत्यजित कदम (१८ मते).
 
शेतीपूरक व शेतीमाल प्रक्रिया मतदारसंघ-आ. आशुतोष काळे (७५० मते, विजयी), सुधीर म्हस्के (१२४ मते)
भटक्या विमुक्त जाती जमाती-गणपतराव सांगळे (२४६१, विजयी), ऋषिकेश ढाकणे (१२८७)
महिला राखीव-अनुराधा नागवडे (२६४१, विजयी), संगीता वाघ (२२९२, विजयी), संध्या महांडुळे (४६४), मंजुषा गुंड (३२).
अनुसूचित जाती जमाती-वैभव पिचड (२६९०, विजयी), प्रशांत लोखंडे (१०८६)
इतर मागास प्रवर्ग-कारभारी जावळे (२६७६, विजयी), जालिंदर वाकचौरे (७३३).
 

Related Articles