युरोप दौर्‍यात बॅडमिंटनपटूंना करावा लागला आर्थिक अडचणींचा सामना   

नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी रविवारी जर्मनीतील हायलो ओपन स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावत भारताच्या युरोप दौर्‍याची सांगता दिमाखात केली. मात्र, या यशामागे भारतीय बॅडमिंटनपटूंना भेडसावलेल्या आर्थिक अडचणींची कहाणीही समोर आली आहे. चार स्पर्धांच्या युरोप दौर्‍यात अनेक खेळाडूंना प्रवास, भोजन आणि निवासाचा खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागला.
 
एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये आलेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) फिनलंड, डेन्मार्क, फ्रान्स आणि जर्मनी येथे झालेल्या चार स्पर्धांसाठी भारतीय संघाला निधी उपलब्ध करून दिला नाही. 6 ऑक्टोबर रोजी वांटा येथे सुरू झालेल्या आर्क्टिक ओपन स्पर्धेच्या काही दिवस आधीच खेळाडूंना या निर्णयाची माहिती देण्यात आली. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्यासाठी त्यांच्याकडे फारसा वेळ नव्हता. या दौर्‍यात फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठणार्‍या सिंधूनेही निधी उपलब्ध न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. मी काही खर्च स्वतः केला, तर माझ्या पाठीराख्या ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टनेही (ओजीक्यू) मदत केली, असे तिने वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. निधीअभावी खेळाडूंना संपूर्ण दौर्‍यात प्रवास, भोजन आणि निवासाचा खर्च स्वतः करावा लागल्याचे वृत्त आहे. मात्र, साईच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने हा दावा फेटाळून लावला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील निकालाचा निधी रोखण्याशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Related Articles