E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
असमर्थनीय मानसिकता (अग्रलेख)
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
महापौर रितू तावडे यांनी साटम यांच्या सुरात सूर मिळवला असताना शिवसेनेचे उपमहापौर संजय घाडी यांनी भाजपला फटकारले आहे. ‘दियाने चांगला संदेश दिला आहे. सणासुदीच्या काळात विनाकारण धार्मिक तेढ निर्माण करू नये’, असे त्यांनी सुनावले.
एखाद्या प्रश्नाकडे वास्तव लक्षात घेऊन न पाहता धर्माचा चष्मा लावून पाहण्याच्या वृत्तीला काय म्हणायचे? भारतीय जनता पक्षामध्ये ती वृत्ती कमालीची भिनली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांतून प्रदूषण टाळण्याचे आवाहन करणारा अभिनेत्री दिया मिर्झा हिचा व्हिडिओ हटविण्याचा निर्णय त्याचेच उदाहरण. न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा ती चित्रफित लावणे महापालिकेला भाग पडणार आहे. ही अतिशय नामुष्की! पण, उठसूठ धर्माचे नाव आणि हिंदुत्वाचा जप केला जाणार असेल, तर असे नामुष्कीचे प्रसंग सतत येत राहणार. या सर्व वादात दर्शन झाले ते भाजप नेत्यांच्या अपरिपक्वतेचे. मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महानगर सुधारण्याची जबाबदारी तेथील मतदारांनी विश्वासाने भाजपकडे सोपवली. त्या विश्वासाला पक्ष किती पात्र ठरला हा वादाचा मुद्दा! पायाभूत सुविधा, प्रदूषण याला मुंबईतील अमाप लोकसंख्या कारण ठरत आहे, हे स्पष्ट असताना मुंबईच्या धर्तीवर आणि नवी मुंबईनंतर तिसर्या मुंबईचा घाट घालण्याची कल्पना याच पक्षाच्या नेत्यांची! प्रदूषणामुळे मुंबईतील रहिवाशांचा श्वास गुदमरत आहे. वाढते वायू प्रदूषण आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश लक्षात घेऊन वलयांकित व्यक्तींच्या मदतीने जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. मग त्यासाठी अभिनेत्री दिया मिर्झा, माधुरी दीक्षित, निशिगंधा वाड, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचे व्हिडिओ तयार करून घेण्यात आले. फटाक्यांमुळे होणार्या प्रदूषणाकडे यातून लक्ष वेधण्यात आले. दिया मिर्झाचा व्हिडिओ महापालिकेच्या हँडलवरून प्रसिद्ध होताच महापौर रितू तावडे यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेत्यांचा संताप झाला. तावडे यांनी दियाला हिंदू विरोधी ठरवले. इतकेच नाही, तर जो हिंदूविरोधी वक्तव्य करेल त्याला देशद्रोही समजले जाईल, असेही या महापौर बाई म्हणाल्या आहेत. दिया मिर्झाला मुंबई महापालिकेच्या काळ्या यादीत टाकण्याची घोषणा त्यांनी करून टाकली. देशप्रेमाचा मक्ता भाजपकडे देण्यात आला आहे का?
नागरी प्रश्नांमध्ये धर्म कशाला?
प्रदूषण टाळण्याच्या आवाहनात हिंदूविरोधाचा संबंध येतो कुठे? पण भाजपचे असंख्य नेते, कार्यकर्ते एका उन्मादातून बोलताना दिसत आहेत. दियाला आणि तिच्या व्हिडिओला विरोध करण्यासाठी तिचे ‘मिर्झा’ आडनाव पुरेसे होतेच. जगजागृती करणार्या चित्रफितीमध्ये दिलेला संदेश हिंदू धर्माच्या विरोधी असल्याचा साक्षात्कार नेते अणि त्यांच्या चेलेचपाट्यांना झाला. ‘दिवाळी कशी साजरी करायची ते दियाने आम्हाला शिकवू नये’, अशी गर्जना मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केली. इतरवेळी या चित्रफितीकडे कोणी गांभीर्याने पाहिले असते का, ही शंकाच आहे! पण ती हटविली गेल्यावर अर्थात तो वादाचा विषय झाला. माधुरी दीक्षित, निशिगंधा वाड, अजिंक्य रहाणे यांचे व्हिडिओ हटविलेले नाहीत. हा फरक का? याचे उत्तर सर्वांना ठाऊक आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणात महापालिकेला जोरदार फटकारले आहे. ते गरजेचे होते. महानगराला भेडसावणार्या प्रश्नात धर्माचे काम काय? हा प्रश्न सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी स्वतःलाच विचारावा. दिवाळी सणाच्या आनंदात अन्य धर्मीय देखील आनंदाने सहभागी होतात. हे सण सर्वांना आपलेसे वाटतात. सणाच्या खरेदीसाठी जेव्हा नागरिक बाजारपेठांमध्ये जातात त्याावेळी ते विक्रेत्याचा, दुकानदाराचा धर्म पाहात नाहीत; पण विशिष्ट धर्माच्या व्यक्तीकडून खरेदी करू नये हे म्हणण्यापर्यंत आणि त्याही पुढे जाऊन बहिष्कारापर्यंत भाजपमधील काही अक्कलवंतांची मजल पोहोचली आहे. मढीच्या यात्रेचे उदाहरण महाराष्ट्रासमोर आहे. सार्वजनिक ठिकाण असलेल्या सारसबागेत बासी ईद साजरी करण्यात कसे अडथळे आणले गेले, हे पुणेकरांनी पाहिले. नवरात्रात दांडियाच्या कार्यक्रमात अन्य धर्मीयांनी सहभागी होऊ नये यासाठी खटाटोप झाला. धर्माच्या नावावर बोलणार्यांना, तसे बोलून अस्मिता टोकदार करणार्यांना आणि वातावरण गढूळ करणार्यांना धर्माचे कोणते आकलन झाले आहे? हिंदुत्वाचा अर्थ आणि आशय त्यांना माहीत आहे का? या प्रश्नाची उत्तरे नकारार्थीच द्यावी लागतील. नागरिकांच्या सोयीसुविधांकडे मुंबई पालिकेतील सत्ताधार्यांनी लक्ष द्यावे, हे बरे!
Related
Articles
तरुण तेजपाल यांना धक्का
07 Nov 2026
बनावट चित्रफित प्रकरणी प्रशांत भूषण यांच्यावर गुन्हा
05 Nov 2026
इस्रायलला शस्त्रखरेदीसाठी निधी देणार नाही
06 Nov 2026
गोकुळ ब्रँड ‘अमुल’च्या घशात घालण्याचा महायुतीचा कुटील डाव
06 Nov 2026
पद्मावती मेट्रो स्थानकासाठी महापालिका देणार 665 चौरस मीटर जागा
06 Nov 2026
दीपोत्सवातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)