E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
शैक्षणिक ,संपादकीय
मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी गुरुंचे महत्त्व
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
शिक्षणबोध : संदीप वाकचौरे
गुरुविण ज्ञान नाही |
ज्ञानविण मुक्ती नाही ॥
भारतीय परंपरेत गुरूचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. अर्थात पाश्चात्त्य देशात देखील गुरूचे स्थान महत्त्वाचे आहेच. जगात जो ज्ञानी असतो त्याला गुरू मानण्याची परंपरा आहे. आपल्याकडे गुरूचे स्थान अनन्य साधारण आहे. गुरू सांगेल त्या मार्गावर विश्वास, श्रद्धा ठेवून प्रवास केला जातो. पाश्चात्त्य देशात गुरूच्या ज्ञानाबद्दल देखील संशय घेऊन पुन्हा ज्ञानाचा प्रवास केला जातो. हा संशय म्हणजे खर्या ज्ञानाच्या वाटेचा प्रवास असतो. आपण जे काही सांगतो, ते अंतिम सत्य आहे असे कोणत्याच गुरूचे म्हणणे नसते. मुळात जो ज्ञानी असतो, त्याला हे ज्ञात असते की, गौतम बद्ध आपल्या शिष्यांना सांगायचे की, मी तुम्हाला जे काही सांगतो, ते अंतिम नाही. मुळात कोणी तरी तुम्हाला सांगतो आहे, त्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या सद्सदविवेक बुद्धीला जे पटते ते अंतिम माना. मुळात विवेकाच्या पातळीवर प्रत्येक ज्ञान घासून पुसून पडताळून पाहण्याची गरज असते. विवेकाच्या पातळीवर जे पडताळून पाहिले जाईल ते खरे ज्ञान असते. त्यामुळे ज्ञानाच्या निर्मितीची वाट जगभरात चालण्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हायला हवेत जे देश ज्ञानाच्या दिशेने चालणे पसंत करतात ते प्रगत झालेले आपणास दिसत आहेत.
माणसांची, राष्ट्राची प्रगती आणि ज्ञान यांचा संबंध आहे. मानवी जीवनात देखील तसेच आहे. जी माणसं ज्ञानाची वाट चालतात, ते प्रगतीच्या दिशेने झेप घेतात. प्रगतीची वाट चालणे घडले की, आपोआपच त्या व्यक्तीच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंदाची वाट सापडत जाते. ज्ञानाचा आणि जीवनाचा अनन्यसाधारण संबंध आहे हे नेहमीच लक्षात घेण्याची गरज आहे. भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान सर्वश्रेष्ठ असे मानले गेले. अलीकडच्या पारंपरिक शिक्षणाच्या प्रक्रियेत देखील गुरूचे स्थान महत्त्वाचे मानले गेले आहे. कदाचित गुरू म्हणून त्यांना संबोधले जात नसेल, वर्तमानातील नाव बदलले तरी पालक, समाजाच्या मनातील शिक्षकांचे असणारे गुरू म्हणून स्थान कायम आहे. मात्र समाज मनात असणारे स्थान कायम राहावे म्हणून गुरूला स्थान प्राप्त करावे लागते. एकूणच गुरूचे स्थान काळ कितीही पुढे गेला, तरी महत्त्व वारंवार अधोरेखित झालेले आपणास दिसून येते. गुरूचे स्थान जीवनात का महत्त्वाचे असे प्रश्न कोणी केला, तर त्याचे उत्तर विविध प्रकारे दिले जाऊ शकते. तो ज्ञानदाता आहे. ज्ञानाचे स्थान जीवनात अनन्यसाधारण आहे.जीवनात ज्ञान असेल तरच जगण्याला अर्थ प्राप्त होतो. ज्ञानाशिवाय जीवनात काहीच महत्त्वाचे नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे, ती व्यक्ती जीवनात कोणत्याही परीस्थितीवर मात करू शकते. ज्ञानाच्या पुढे परिस्थितीची किंमत नाही. ज्ञानी माणूस परिस्थितीवर मात करू शकतो, त्यामुळे समर्थ म्हणतात की,
गुरुविण ज्ञान नाही |
ज्ञानविण मुक्ती नाही ॥
गुरु, ज्ञान आणि मुक्ती यांतील
परस्परसंबंध देखील लक्षात घेण्याची गरज आहे. मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी गुरू हा केंद्रबिंदू असल्याचे सर्व तत्त्वज्ञ सांगत आले आहेत. गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि ज्ञानाशिवाय जीवनातील अज्ञान, दुःख, भ्रम व बंधने यांपासून मुक्तता मिळत नाही.जीवनात गुरू उत्तम प्राप्त झाला, तर शिष्याच्या आयुष्यात आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि नैतिक जीवनाचेही गूढ तत्त्वज्ञान उलगडण्यास मदत होते. गुरूचे स्थान सर्व धर्मात जर अनन्य साधारण असेल, तर गुरू कोणाला म्हणावे ? नेमके गुरू म्हणजे कोण? गुरू म्हणजे काही फक्त माळा घालणारी माणसं, केवळ विशिष्ट प्रकारची वस्त्र परिधान करणारी माणसं नाही. मंदिर, चर्च, मस्जिदमध्ये उपदेश करतात ते गुरू असतात का ? किंबहुना गुरू हा केवळ शाळेत शिकवणारा शिक्षक नसतो. खरंतर गुरू या शब्दाचा विचार केला, तर त्यातील पहिले अक्षर आहे गुरु म्हणजे नाश करणारा. जो मानवी जीवनात अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करतो, तो अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो त्याला गुरु म्हणतात. जीवनात असणारा अंधकार अज्ञानाचा असतोच, ते अज्ञान विविध विषयांचे असते. ते नष्ट करणे हे शिक्षणाचे काम आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून आपले शिक्षक केवळ अक्षराचा प्रकाश पेरत नाही. तर जीवनाला प्रकाशाची वाट दाखवत असतात.
प्रकाशाची वाट
गुरू ज्ञानाच्या जोरावर शिष्याच्या आयुष्यात प्रकाशाची पेरणी करत असल्यानेच त्याच्या जीवनाला उंची प्राप्त होत असते. प्रत्येक धर्मातील गुरू हा माणसाला योग्य मार्ग दाखवत असतो. जीवनाला योग्य दिशा देत असतो. त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाला पैलू पाडत असतो. आई-वडील, शिक्षक, संत-महात्मे, विद्वान व्यक्ती, तसेच आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारा प्रत्येक जण गुरुच्या भूमिकेत असतो. दत्त महाराजांनी आपल्या जीवनात २४ गुरू केले होते. हे गुरू करणे म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील मबअज्ञान दूर करणारी व्यक्ती असते. त्याचप्रमाणे नवे काही देण्याचा प्रयत्न ते करत असतात. संत कबीर म्हणतात,
गुरु गोविंद दोऊ खडे,
काके लागूं पाय|
बलिहारी गुरु आपल्या,
गोविंद दियो बताय॥
यातून गुरू हा ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणारा असल्याचे स्पष्ट होते. गुरू ईश्वराचे दर्शन घडवतात. खरंतर ज्ञान हेच ईश्वराचे स्वरूप आहे. त्यामुळे गुरूचे बोट धरून चालण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला जीवनात ज्ञानाचा प्रकाश मिळेल. हा ज्ञान प्रकाश म्हणजे ईश्वराचे अस्तित्व आहे. त्यामुळे कबीर जे काही सांगत आहेत, ते अधिक महत्त्वाचे आहे. ज्ञान हेच मानवी जीवनाचे खरे धन आहे; परंतु ज्ञान केवळ पुस्तक वाचून प्राप्त होत नाही. पुस्तकात फक्त माहिती मिळते, पण त्या माहितीचे आकलन, विश्लेषण आणि योग्य उपयोग करण्याची क्षमता, योग्य आणि अयोग्य काय हा विचार रूजवण्याची क्षमता गुरू विकसित करत असतो. गुरू विद्यार्थ्याच्या मनातील शंका दूर करतो, त्याला विचार करण्याची दिशा देत असतो. सत्य-असत्य यातील फरक जाणून देत असतो. एखाद्या विद्यार्थ्याला अगदी भाषा, विज्ञान, परकीय विषयाचे, गणिताचे पुस्तक दिले तरी शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय विद्यार्थी कठीण संकल्पना समजून घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जीवनाशी नाते सांगणारे, विश्वातील विशाल ज्ञान तसेच विविध विषयांचे आकलनही गुरूच्या साहाय्याशिवाय होऊ शकत नाही.
ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियेत गुरू मार्गदर्शक, प्रेरक आणि मूल्यसंस्कार करणारा असतो. त्यामुळे जग कितीही पुढे गेले, माहिती तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली, तरीसुद्धा जीवनात गुरूचे स्थान कमी होण्याची शक्यता नाही. छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद यांच्या सारख्या महान व्यक्तींच्या आयुष्यातही गुरूचे स्थान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या मोठ्या भावाला, निवृत्तीनाथांना गुरू मानले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ निर्माण केला. संत तुकोबांच्या जीवनात चैतन्य महाराजांनी दिलेला मंत्र पुढे जीवनभर त्यांनी सोबत ठेवत, त्याच मार्गाने चालणे पसंत केले. प्रत्येक माणसाच्या आयुष्याला जो काही अर्थ प्राप्त झाला आहे, त्याला गुरूने सापडवलेली वाट हे एक महत्त्वाचे कारण आहे लक्षात घेण्याचे गरज आहे.
ज्ञानाचे मोल अनन्य साधारण
ज्ञान देतो, ते गुरू आहे असे मानले जाते. खरे तर ज्ञानाचे मोल अनन्यसाधारण आहे. त्यामुळे ज्ञानी असलेल्या गुरूचे स्थान समाजमनात अधिक महत्त्वाचे मानले गेले आहे. ज्ञानाचे मोल इतके असेल, तर ते ज्ञान म्हणजे नेमके काय आहे ? खरे तर ज्ञान म्हणजे केवळ अक्षरांची ओळख किंवा माहिती नाही. एका अर्थाने ज्ञान म्हणजे सत्याची जाणीव, सद्सदविवेकबुद्धी, योग्य-अयोग्य यातील फरक कळणे आणि जीवनाचे प्रयोजन नेमके काय आहे हे समजणे देखील महत्त्वाचे. शिक्षणामुळे माणूस सुशिक्षित होतो; पण ज्ञानामुळे तो सुसंस्कृत होतो. ज्ञानामुळे माणूस अंधश्रद्धा, भीती, संकुचितपणा आणि अज्ञान यांपासून मुक्त होत असतो. ज्ञान व्यक्तीला स्वतंत्र विचार करण्याची शक्ती देते. म्हणूनच ज्ञान हे जीवन विकासाचे प्रमुख साधन मानले जाते. ज्ञानेविण मुक्ती नाही असे म्हटले जाते, मात्र मुक्ती या शब्दाचा अर्थ केवळ मोक्ष नाही. त्याचा व्यापक अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर बंधनातून मुक्त होणे असा आहे.
अज्ञान, लोभ, क्रोध, मत्सर, अहंकार, भीती आणि चुकीच्या विचारांच्या बंधनातून मुक्त होणे म्हणजे मुक्ती. ही मुक्ती ज्ञानाद्वारेच प्राप्त होते. म्हणून अज्ञानी माणसांपेक्षा ज्ञानी माणसं अधिक सुखी आहे असे मानले जाते. अंधार्या खोलीत प्रकाश आल्यावर अंधार नाहीसा होतो. ज्ञानाचा प्रकाश जीवनात डोकावला की, जीवनातील अज्ञान नाहीसे होते. अज्ञानामुळे निर्माण होणारे दुःख, भ्रम आणि चुकीचे निर्णय दूर होतात. त्यामुळे जीवन अधिक आनंदी, शांत आणि यशस्वी होण्यास मदत होते. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानाचा उपदेश करत आहेत. त्या ज्ञानामुळे अर्जुनाचा मोह दूर होतो आणि तो आपल्या कर्तव्याच्या मार्गावर ठामपणे उभा राहताना दिसतो आहे.
माहिती म्हणजे ज्ञान नाही
आज जग वेगाने पुढे जात आहे. आंतरजाल, कृत्रिम बुद्धिमत्ता, मोबाईल आणि विविध तंत्रज्ञानाने प्रगतीची झेप घेतली आहे. आपल्याला हवी असलेली माहिती केव्हाही आणि कोणतीही माहिती सहज मिळू शकते; परंतु ही माहिती म्हणजे ज्ञान नाही. आपल्या जे काही हवे आहे, त्यासाठी योग्य माहितीची निवड करता येणे. आपल्याकडे प्रचंड माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र त्याचवेळी आहे, त्या माहितीचे विश्लेषण करता येणे. त्या प्राप्त माहितीचे योग्य उपयोजन करता येण्याची गरज असते. अशावेळी आपल्याला मार्गदर्शकाची आवश्यकता असते. त्यामुळे आधुनिक काळातही शिक्षकांचे महत्त्व कमी झालेले नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच मूल्यशिक्षण, नैतिकता, सामाजिक जबाबदारी आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देण्याची गरज असते. त्या विषयावर पुस्तके वाचली म्हणजे व्यक्तिमत्त्वाला पैलू पडतील असे नाही. शिक्षक विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देतात, त्यांच्या क्षमतांचा विकास करतात आणि त्यांना जबाबदार नागरिक बनवतात. एका अर्थाने लोकशाही मार्गासाठी आवश्यक असलेले सुजाण नागरिक निर्माण करण्याचे काम केले जात असते.
गुरु शिष्य परंपरा
आपल्या संस्कृतीत असलेली गुरु-शिष्य परंपरा मोठी आहेच. गुरु-शिष्य परंपरा ही ज्ञानसंवर्धनाची महान परंपरा आहे. या परंपरेमुळेच वेद, उपनिषदे, तत्त्वज्ञान, कला, विज्ञान आणि संस्कृतीची आजवर जोपासना झाली आहे. गुरु केवळ ज्ञान देत नाही तर जीवन जगण्याची कला शिकवत असतो. गुरु-शिष्य नात्यामुळे राष्ट्रनिर्मितीचे महान कार्य घडण्यास हातभार लागत आहे. गुरुचे कार्य केवळ व्यक्तीपुरते मर्यादित नाही. समाज आणि राष्ट्रनिर्मितीपर्यंत पोहोचते हे स्पष्ट होते. शिक्षकांचा आदर करावा. जिज्ञासू वृत्ती ठेवावी. सतत ज्ञानार्जन करावे. शंका विचारण्यास संकोच करू नये. तसे केल्याने आपण ज्ञानापासून दूर जाण्याची शक्यता असते. ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी करायला हवा. अहंकार टाळून विनम्रता जोपासण्याची गरज असते. जीवनभर शिकत राहण्याची वृत्ती असण्याची नितांत गरज आहे. गुरुविण ज्ञान नाही | ज्ञानविण मुक्ती नाही हे शब्द मानवी जीवनाचे सार सांगणारे आहे. गुरु हा ज्ञानाचा स्रोत आहे आणि ज्ञान हे मुक्तीचे साधन आहे. गुरुच्या मार्गदर्शनातून प्राप्त झालेले ज्ञान माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देते, त्याच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करते आणि त्याला आत्मोन्नतीच्या मार्गावर नेते. म्हणूनच गुरू, ज्ञान आणि मुक्ती ही एकमेकांशी अभेद्यरीत्या जोडलेली त्रिसूत्री आहे.
Related
Articles
दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर शिवसेनेची दिवाळी
06 Nov 2026
मोहिते-पाटलांची टक्कर कायम
09 Nov 2026
मुलांना सुरक्षिततेची जाणीव देणे गरजेचे
10 Nov 2026
शेअर बाजारात किरकोळ वाढ
05 Nov 2026
शिवाजीनगर एसटी बसस्थानक अत्याधुनिक होणार
05 Nov 2026
शेतकर्यांनी हक्कासाठी रस्त्यावर उतरावे : राजू शेट्टी
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)