रब्बी पेरण्यांचा वेग मंदावला   

वृत्तवेध 

देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली असली, तरी बदलते हवामान, मान्सूनमधील तूट आणि जलाशयांतील घटता पाणीसाठा यामुळे पेरणीचा वेग मंदावला आहे. देशातील प्रमुख जलाशयांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २४.५ टक्के कमी पाणीसाठा आहे. दक्षिण भारतातील जलाशयांची स्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे. त्यामुळे यंदाच्या २०२६-२७ च्या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीवर आणि उत्पादनावर संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्रीय कृषी विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, १६ ऑक्टोबरपर्यंत देशात रब्बी पिकांची एकूण पेरणी ३.४३ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ४.६५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे यंदा पेरणीचे क्षेत्र १.२२ लाख हेक्टरने कमी आहे. तेलबिया पिकांच्या पेरणीचे क्षेत्रही घटले आहे. गेल्या वर्षी ३.११ लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी झाली होती. यंदा हे क्षेत्र २.२९ लाख हेक्टर नोंदवण्यात आले आहे. रब्बी हंगामातील भाताचे पेरणी क्षेत्र १.३४ लाख हेक्टरवरून घटून ०.८८ लाख हेक्टर झाले आहे. दुसरीकडे, कडधान्यांचे पेरणी क्षेत्र ०.१० लाख हेक्टरवरून वाढून ०.१५ लाख हेक्टर झाले आहे. गव्हाच्या पेरणीला अद्याप सुरुवात झालेली नाही; मात्र रब्बी हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील या आकडेवारीवरून संपूर्ण हंगामाच्या उत्पादनाचा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. बहुतांश पिकांची पेरणी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार असून, सध्या शेतकरी खरीप पिकांची काढणी आणि रब्बीच्या पेरणीसाठी शेतजमिनी तयार करण्यात व्यग्र आहेत.
 
‘अल निनो’चा संभाव्य प्रभाव, सरासरीपेक्षा कमी मान्सून पाऊस आणि जमिनीतील ओलाव्याची कमतरता यामुळे यंदाच्या रब्बी हंगामासमोर गंभीर आव्हान उभे राहू शकते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे गहू, हरभरा, मोहरी, कडधान्ये आणि तेलबिया पिकांच्या पेरणीवर तसेच उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास पेरणीला विलंब होऊ शकतो. तसेच, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर पाण्याची उपलब्धता कमी पडल्यास उत्पादन घटण्याचा धोका आहे. सिंचनासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून घ्यावे लागल्यास शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही वाढू शकतो. देशातील प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि सामान्य पातळीच्या तुलनेतही कमी आहे. केंद्रीय जल आयोगाच्या ताज्या अहवालानुसार, देशातील १७८ प्रमुख जलाशयांमध्ये एकूण १२६.७१७ अब्ज घनमीटर (बीसीएम) पाणीसाठा उपलब्ध आहे. तो या जलाशयांच्या एकूण उपयुक्त साठवण क्षमतेच्या ६८.५८ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या जलाशयांमध्ये १६७.९१० अब्ज घनमीटर पाणीसाठा होता. तर मागील दहा वर्षांमधील सरासरी पाणीसाठा १५१.६४७ अब्ज घनमीटर आहे.

Related Articles