E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे उद्घाटन
पिंपरी : शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे असून देशातील शहरांचा विकास करण्यावर केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने भर दिला आहे. आमचे सरकार येण्याआधी मेट्रोचे जाळे २३८ किलोमीटर इतके होते. ते आज १२०० किलोमीटरवर पोहोचले आहे. पूर्वी केवळ पाच शहरांत असलेली मेट्रो आज २६ शहरांत धावत असून एक कोटीपेक्षा अधिक नागरिक प्रवास करत आहेत. जगातील पहिल्या तीन मेट्रोमध्ये भारतीय मेट्रोचा समावेश झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे पुण्याच्या विकासाला गती मिळेल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत एनडीए सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही मोदी यांनी यावेळी दिली. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो लाइन तीनचे उद्घाटन मंगळवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले.
यावेळी केंद्रीय मंत्री मनोहर लाल, राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे ऑनलाइन उपस्थित होते. बालेवाडी क्रीडा संकुल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, शंकर मांडेकर, भीमराव तापकीर, सुनील शेळके, उमा खापरे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त अभिजित चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजू लक्ष्मी, पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीस मराठीत दिवाळीच्या शुभेच्छा देत केली. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गामुळे आयटी क्षेत्राची इतर भागाशी कनेक्टिव्हिटी वाढेल. मेट्रोमुळे पुण्याच्या विकासाला गती मिळेल. पूर्वी शहरांची ओळख उद्योग आणि खाद्यसंस्कृती यावरून होत होती. आता कोणते शहर सुरक्षित आहे, त्या शहराचे राहणीमान कसे आहे, याचा विचार होतो. शहरांच्या विस्तारीकरणा बरोबर दळणवळणाच्या सुविधा मिळाल्या तर वेळ वाचतो, उत्पादकता वाढते. अर्थव्यवस्था वाढीस लागते. गरीब व श्रीमंत सर्वांनाच याचा फायदा होतो, असेही मोदी म्हणाले.
पुण्यात मेट्रोला बरीच वर्षे लागली असती. मात्र, २०१४ मध्ये एनडीए सरकार आल्यानंतर शहरातील मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणावर भर देण्यात आला. त्यातून पूर्वी पाच शहरांत असलेली मेट्रो आज २६ शहरांत धावत आहे. महाराष्ट्रातही मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण केले जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकर्यांप्रति सरकारला संवेदना असून राज्याने मदतही दिली आहे आम्ही शेतकर्यांसोबत आहोत शेतकर्यांच्या घरी दिवाळी आनंदाने साजरी व्हावी, ही खरे तर आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही मोदी म्हणाले.
२०३० पर्यंत पिंपरी-चिंचवड व पुणे दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पासाठी ८३१३ कोटी खर्च झाला आहे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात आलेला हा देशातील पहिलाच मेट्रो प्रकल्प आहे. हिंजवडीचे देशाच्या आयटीमध्ये मोठे योगदान आहे. हजारो लाखो लोक येथे पोटापाण्यासाठी येतात. मात्र, ते रोज वाहतूक कोंडीत अडकतात. त्यामुळे ही मेट्रो कधी पूर्ण होईल, याबाबत उत्सुकता होती. मात्र, आता त्यांची चिंता मिटली आहे. 'पिंक लाईन' म्हणून ओळखल्या जाणार्या या मेट्रोला महिला शक्ती संचलित करणार आहेत. सर्वात जास्त मेट्रो मार्ग महाराष्ट्रात आहेत. आधुनिकता रोजगार आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. २०३० पर्यंत पिंपरी-चिंचवड व पुणे दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा सरकारचा संकल्प आहे.
महिलांनी संचलित केलेली ही मेट्रो सावित्रीबाई फुले यांना मोठी आदरांजली
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग हे आधुनिकता सुरक्षितता व पर्यावरण पूरक वाहतुकीच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. ही मेट्रो शंभर टक्के महिला संचलित असणार आहे. महिलांनी संचलित केलेली ही मेट्रो सावित्रीबाई फुले यांना मोठी आदरांजली असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. मेट्रो साठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा पाठपुरावा केला. अर्थमंत्री या नात्याने निधी दिला. याची आठवण सुनेत्रा पवार यांनी यावेळी करून दिली.
पुण्याच्या भविष्याला आकार देणारा असा हा मेट्रो प्रकल्प
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पुण्याच्या भविष्याला आकार देणारा असा हा मेट्रो प्रकल्प आहे. आमच्या लाडक्या बहिणी मेट्रो संचालित करणार आहेत. महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत याचे हे उदाहरण आहे. काही लोक विकासाला विरोध करतात. मात्र, जनता त्यांना उत्तर देईल. पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या विकासात अजित पवार यांचा सिंहाचा वाटा होता. ते प्रकल्पांना चालना देण्यासाठी सतत प्रयत्न करत. त्यामुळे आज त्यांची आठवण होत असल्याचे शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थिनींशी संवाद
पिंपरी : पुणे मेट्रोच्या माण-हिंजवडी नव्या मार्गाचे उद्घाटन आणि पुणे मेट्रो फेज-२ च्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या सह मेट्रोतून प्रवास केला. या नव्या मार्गावरील पहिले तिकीट घेऊन फडणवीस यांनी मेट्रो प्रवासाचा अनुभव घेतला.
पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्र्यांना मेट्रो मार्ग, स्थानके आणि प्रकल्पाच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती दिली.
या प्रवासात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
या प्रवासाचे विशेष आकर्षण म्हणजे 'पिंक मेट्रो'चे संचालन महिला ट्रेन पायलटकडे होते. लीड ट्रेन पायलट प्रगती बिरादार यांनी मेट्रोचे सारथ्य केले, तर ट्रेन पायलट ऐश्वर्या सूर्यपूजारी यांनीही या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली. महिला कर्मचार्यांच्या सक्षम सहभागातून आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिलांच्या योगदानाचे दर्शन यानिमित्ताने घडले.
प्रवासा दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाळकरी विद्यार्थिनी, आयटीएन्स यांच्याशी संवाद साधला. मेट्रो प्रवासाचा अनुभव, उपलब्ध सुविधा आणि नव्या मार्गामुळे दैनंदिन प्रवासात होणारे फायदे जाणून घेतले. मुख्यमंत्री व ज्येष्ठांनी हिंजवडी फेज-२ मेट्रो स्थानकापर्यंत सुमारे सहा किलोमीटरचा प्रवास केला.
Related
Articles
दिवाळी बचत बाजारात दोन दिवसांत 30 लाखांची उलाढाल
03 Nov 2026
फॉर्म ६ मधून आता घोषणापत्र स्वतंत्र
05 Nov 2026
मुख्यमंत्री सहायता निधीस विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दोन कोटींची मदत
05 Nov 2026
आयुषच्या तिन्ही अभ्यासक्रमांना 84.30 टक्के प्रवेश
09 Nov 2026
’गोकुळ’वर कब्जा करण्यासाठी सहकार कायद्यात दुरुस्ती
05 Nov 2026
केवळ घुसखोरांच्या संरक्षणासाठी इंडिया आघाडीचा महामेळावा : सुवेंदू
04 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित
6
केवळ घुसखोरांच्या संरक्षणासाठी इंडिया आघाडीचा महामेळावा : सुवेंदू