बर्फाचे थर घटल्याने जगभर दुष्काळ   

महापूर व वणव्यांचा धोका; तत्काळ कारवाईची गरज  

नवी दिल्ली : जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीवरील बर्फाचे थर व हिमनद्या वेगाने वितळत असून, हे संकट दूरवरच्या भागांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगासाठी गंभीर इशारा ठरणार आहे, असा इशारा ‘इंटरनेशनल क्रायोस्फीयर क्लायमेट इनिशिएटिव्ह’ (आयसीसीआय) व संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात दिला आहे.
 
आयसीसीआयचे मुख्य वैज्ञानिक आणि अहवालाचे सह-लेखक जेम्स किर्कहॅम यांनी सांगितले की, पृथ्वीच्या तापमानाने १.५ अंश सेल्सिअसची मर्यादा तात्पुरती ओलांडल्यास ‘क्रायोस्फीयर’वर (म्हणजेच ग्लेशियर्स, बर्फाच्या चादरी व समुद्रातील बर्फ) त्याचे अतिशय गंभीर आणि दीर्घकालीन दुष्परिणाम होतील. येत्या काही दशकांत समुद्राची पातळी वाढल्याने कोट्यवधी लोकांना याचा फटका बसणार आहे.  

नेपाळ व सिक्कीममधील आपत्ती केवळ सुरुवात

तापमानवाढीमुळे पर्वतांना एकत्र बांधून ठेवणारा ‘परमाफ्रॉस्ट’ (गोठलेला थर) वितळत असल्याने भूस्खलन, हिमस्खलन व पर्वत ढासळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
२०२६ मध्ये नेपाळमध्ये आणि २०२३ मध्ये सिक्कीममध्ये घडलेल्या भीषण आपत्ती या याच प्रक्रियेचा भाग असल्याचे किर्कहॅम यांनी स्पष्ट केले. समुद्रातील बर्फ वितळल्याने जगभरात दुष्काळ, महापूर आणि वणवे यांसारख्या टोकाच्या हवामान बदलांना सामोरे जावे लागत आहे.

येणारा काळ असेल भीषण संकटाचा

या आपत्तींचा सामना करण्यासाठी तात्काळ जागतिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.धोकादायक पर्वतीय भागांत आणि हिमनद्यांवर देखरेख ठेवण्यासाठी आधुनिक पूर्वसूचना प्रणाली बसवणे, उत्सर्जनाचे प्रमाण वेगाने कमी करणे  अत्यंत गरजेचे आहे.जागतिक नेत्यांनी बर्फ वितळण्याचा हा वेग मंदावण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर येणारा काळ भीषण संकटांचा असेल, हा इशारा दिला आहे.

Related Articles