एका भारतीयाचा मृत्यू
काठमांडू : नेपाळच्या सोलुखुम्बू जिल्ह्यात मंगळवारी दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली. या दुर्घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून, एक अन्य प्रवासी जखमी झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सोलुखुम्बु जिल्ह्यातील खुम्बु पासांग ल्हुामु नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ४ मध्ये हेलिपॅडवर उतरत असताना ही दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली. काल सकाळी सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडली. ’फिशटेल एअर’ आणि ’एअर डायनेस्टी’ कंपनीची ही हेलिकॉप्टर होती. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही हेलिकॉप्टर एकमेकांच्या जवळ येताना आणि त्यांची धडक बसताना पाहायला मिळत आहे. या दोन्ही हेलिकॉप्टरने माऊंट एव्हरेस्टचे प्रवेशद्वार मानल्या जाणार्या ’लुक्ला विमानतळा’वरून उड्डाण केले होते.
वसंत कुमार बालारामा रामडू (वय-४७ भारतीय नागरिक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते ’फिशटेल एअर’च्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. तर, भारतीय वंशाचे न्यूझीलंडमधील रहिवासी शैलेश कृष्ण पटेल (वय-४९) जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरद्वारे काठमांडू येथील मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, असे पोलिस निरीक्षक मौसम तामांग यांनी सांगितले.
या दुर्घटनेत ’फिशटेल एअर’चे रवींद्र प्रजापती आणि ’डायनेस्टी एअर’चे प्रज्वल के. सी. हे नेपाळी वैमानिकही जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी काठमांडू येथे नेण्यात आले आहे. ’डायनेस्टी एअर’चे हेलिकॉप्टर मालवाहू होते. अपघातग्रस्त ठिकाण माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या मार्गावर असून, ते काठमांडूपासून १५० किमी ईशान्येला आहे. दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये एकूण किती प्रवासी होते, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या घटनेचा तपशील पोलिस गोळा करत आहेत.
Fans
Followers