ब्रिटिश नौदल आणि हवाई दल इराणकडून दहशतवादी घोषित   

अमेरिका-इस्रायलला लष्करी मदत केल्याचा आरोप

तेहरान : इराणने ब्रिटनच्या नौदल आणि हवाई दलाला दहशतवादी संघटना घोषित केले असून, ब्रिटिश गुप्तचर संस्था एम-१६ ला शत्रू गट ठरवले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात घोषणा केली. अमेरिका आणि इस्रायलला इराणविरोधातील लष्करी कारवाईसाठी ब्रिटनने मदत केल्याचा आरोप इराणने केला आहे. ब्रिटनने काही महिन्यांपूर्वी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी संघटना घोषित केले होते. त्यानंतर इराणने ही प्रत्युत्तरात्मक भूमिका घेतल्याचे मानले जात आहे.
 
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ब्रिटनने अमेरिका आणि इस्रायलला इराणविरोधातील युद्धात लष्करी तळ आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे ब्रिटिश नौदल आणि हवाई दलाविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे निर्माण होणार्‍या परिणामांसाठी ब्रिटिश सरकार जबाबदार असेल, असा इशाराही इराणने दिला आहे.
 
मार्च २०२६ मध्ये ब्रिटनने अमेरिकेला आरएएफ फेअरफोर्ड आणि डिएगो गार्सिया या दोन लष्करी तळांचा वापर करण्याची परवानगी दिली होती. या तळांवरून इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेला मदत मिळू शकत होती. ब्रिटनने हा निर्णय मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे सांगितले होते. मात्र, इराणने त्याकडे आपल्या विरोधातील अमेरिकेच्या लष्करी कारवाईला दिलेला पाठिंबा म्हणून पाहिले.
 
ब्रिटनने १३ जुलै रोजी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी संघटना घोषित करून कठोर निर्बंध लागू केले होते. या निर्णयानुसार ब्रिटनमध्ये आयआरदीसीला मदत करणे किंवा त्याला पाठिंबा देणे हा गंभीर गुन्हा ठरू शकतो. त्यासाठी १४ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. ब्रिटनच्या या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून इराणने ब्रिटिश लष्करी दलांविरोधात कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि लष्करी तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
 

Related Articles