‘एसआयआर’नंतर पाच राज्यांत सव्वादोन कोटी मतदार घटले   

उत्तर प्रदेशात दोन कोटी मतदार घटले

नवी दिल्ली : मतदार याद्यांच्या विशेष तीव्र पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेनंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यांमधील मतदारांच्या संख्येत सव्वादोन कोटींची घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या पाचही राज्यांत पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.
 
निवडणूक आयोग आणि संबंधित राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी  जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या पाच राज्यांत एसआयआरपूर्वी सुमारे १८.७१ कोटी मतदार होते. एसआयआरनंतर १६.४३ मतदार आहेत. याचाच अर्थ सुमारे २.२९ कोटी (१२.२ टक्के) मतदारांची नावे कमी झाली आहेत. या पाच राज्यांत सर्वाधिक मतदारसंख्या उत्तर प्रदेशात असून, एकूण घटलेल्या मतदारांपैकी सुमारे ९० टक्के मतदार एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत. उत्तर प्रदेशात एसआयआरपूर्वी १५.४४ कोटी मतदार होते. प्रारूप यादीत ही संख्या घटून १२.५६ कोटी झाली. दावे आणि हरकतीनंतर ही संख्या ८४ लाखांनी वाढून १३.४० कोटींवर पोहोचली. एकंदरीत, एसआयआर अंतर्गत २.०४ कोटी (१३.२४ टक्के) मतदारांची घट झाली.  
 
पंजाबमध्ये एसआयआरपूर्वी २.१५ कोटी मतदार होते. प्रारूप यादीत ही संख्या घटून १.९४ कोटीवर आली. अंतिम यादीत सात लाख नावे वाढली. त्यामुळे मतदारसंख्या २.०१ कोटींवर पोहोचली. राज्यात ६.३४ टक्के  म्हणजे १४ लाख नावे कमी झाली. प्रारूप यादीत २१ लाख नावे कमी झाली होती. त्यापैकी, सुमारे ३४ टक्के नावे पुन्हा जोडली गेली. उत्तराखंडमध्ये एसआयआरपूर्वी ८० लाख मतदार होते. मसुदा यादीत ही संख्या ७१ लाख झाली. अंतिम यादीत ती ७२ लाखांवर पोहोचली. एकूण ८ लाख (१०.७ टक्के) नावे कमी झाली. मसुदा यादीत हटविलेल्या नावांपैकी केवळ ३ टक्के नावे पुन्हा जोडली गेली. मणिपूरमध्ये एसआयआरपूर्वी २०.९ लाख मतदार होते. मसुदा यादीत ही संख्या घटून १९.३ लाखांवर आली. अंतिम यादीत ती १९.६ लाखांवर पोहोचली. राज्यात १ लाख ३० हजार (६.३३ टक्के) नावे कमी झाली. 
 
गोव्यात एसआयआरपूर्वी ११.८५ लाख मतदार होते. मसुदा यादीत ही संख्या १०.८५ लाख आणि अंतिम यादीत १०.५८ लाखांवर पोहोचली. राज्यात १ लाख ३० हजार (१०.७६ टक्के) नावे कमी झाली.  उत्तर प्रदेश विधानसभेचा (४०३ सदस्य) कार्यकाळ पुढील वर्षी २२ मे रोजी संपणार आहे. तर मणिपूर (६० सदस्य), गोवा (४० सदस्य), पंजाब (११७ सदस्य) आणि उत्तराखंड (७० सदस्य) विधानसभांचे कार्यकाळ मार्च २०२७ मध्ये संपणार आहे. 
 

Related Articles