‘त्या’ आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी अर्ज   

पाटणा : बिहार विधान परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या दोन आमदारांनी आपण भाजपमध्ये सामील झाले असल्याची कबुली दिली आहे. या दोन्ही आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, यासाठी जन सुराज पक्षाने विधान परिषदेच्या सभापतींकडे अर्ज दाखल केला आहे. 
 
जन सुराज पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार किशोर कुमार मुन्ना, रामबली सिंह चंद्रवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल वकील पार्थ सारथी यांच्यासमवेत सभापती राम बचन राय यांची भेट घेतली. तसेच, अर्जासोबत महत्त्वाची कागदपत्रे सोपविली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना विधान परिषद सदस्य बंशीधर बृजवासी आणि राहुल राज यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. 
 
बिहारसह चार राज्यांत २८ जागांसाठी विधान परिषद निवडणूक पार पडली. बृजवासी हे तिरहुत पदवीधर आणि राज हे सारण शिक्षक मतदारसंघातून निवडून आले. निकालानंतर अवघ्या ७२ तासांत दोघेही भाजपमध्ये सामील झाले. या दोघांनी कलम १९१ चे उल्लंघन केले असून या दोघांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी जन सुराजने केली आहे. 
 
या दोघांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, निकालानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे आणि पक्ष प्रवेशाशी संबंधित चित्रफीत आणि माध्यमातील वृत्तेही सभापतींकडे सोपविली आहेत, जन सुराजने म्हटले आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांनी आपण केवळ भाजपला पाठिंबा दिला असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही आमदारांनी संयुक्त जनता दलाच्या जेडी(यू)उमेदवारांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे, राज्यात भाजप आणि संयुक्त जनता दलाची सत्ता आहे. जेडीयूने विधान परिषदेच्या चार जागा लढविल्या होत्या. त्यापैकी, केवळ एकच जागा जेडीयूने जिंकली आहे. तर, भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत.
 

Related Articles