पंजाबमधील ‘आप’चे तीन बंडखोर आमदार भाजपमध्ये   

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. ‘आप’चे तीन बंडखोर आमदार सोमवारी भाजपमध्ये दाखल झाले. यामध्ये कुंवर विजय प्रताप सिंह, चेतन सिंह जौरामाजरा आणि हरमीत सिंह पठाणमाजरा यांचा समावेश आहे.
 
कुंवर विजय प्रताप सिंह हे माजी आयपीएस अधिकारी असून त्यांनी काल सकाळीच आपण आमदारकीचा राजीनामा दिा असल्याचे सांगितले होते. ते अमृतसर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते.
 
सिंह यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष कुलतार सिंह संधवान यांच्याकडे पाठवला आहे. याबाबतची माहिती स्वतः सिंह यांनी समाज माध्यमावरील पोस्टद्वारे दिली आहे. जून २०२५ मध्ये ‘आप’ने सिंह यांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून निलंबित केले होते. 
 
सिंह यांनी आमदार चेतन सिंह जौरामाजरा आणि हरमीत सिंह पठाणमाजरा यांच्यासह भाजपच्या मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
चेतन सिंग जौरामाजरा आणि हरमीत सिंग पठाणमाजरा यांनी रविवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. हरमीत सिंग हे सनौरचे तर चेतन सिंग हे समाना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.
 
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. ‘आप’ने दोन दिवसांपूर्वी ४० उमेदवारांची नावे जाहीर केली. ते सर्व विद्यमान आमदार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांचा देखील समावेश आहे.
 

Related Articles