कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस   

विदर्भात सोसाट्याचा वारा,  ‘मुरासू’ चक्रीवादळाचा प्रभाव 

पुणे : ‘मुरासू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज (मंगळवार) पासून तीन दिवस मेघगर्जना, ढगांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मात्र जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात केवळ सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
 
पश्‍चिम मध्य व लगतच्या नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरातील तीव्र चक्रीवादळ ‘मुरासू’ पश्‍चिम वायव्य दिशेकडे सरकले आहे. ते आता पश्‍चिम मध्य बंगालच्या उपसागरावर आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. आजही पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. पुढील दोन दिवसांनंतर मात्र चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार असल्याने पावसाचा प्रभावही कमी होणार असल्याचा अंदाज आहे. 
 
आज संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगरमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वार्‍यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांत मेघगर्जना व विजांचा कडकडाट होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
 
शहरात पडलेला पाऊस 
 
ठिकाणी           पाऊस (मिमी मध्ये)
शिवाजीनगर      41.1 मिमी
हडपसर              35.5 मिमी
मगरपट्टा              30.5 मिमी 
लोहगाव               27   मिमी
पाषाण              14.6 मिमी
एनडीए              12.7 मिमी 
 
धारण क्षेत्रात पडलेला पाऊस 
 
धरण                  पाऊस        टीएमसी        टक्केवारी 
खडकवासला 8 मिमी           1.12 56.82
पानशेत            13 मिमी         8.27           77.67
वरसगाव          11 मिमी 10.98 85.63
टेमघर               5 मिमी          3.14 84.63
एकूण             37 मिमी 23.51           80.65
 
पुण्यात पावसामुळे रस्त्यांवर पाणी व वाहतूक कोंडी 
 
पुणे शहर आणि परिसरात रविवारी रात्री उशिरा आणि सोमवारी सकाळी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसामुळे बहुतांश रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पाऊस थांबल्यानंतरही दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे तपमानात घट झाली असून, हवेत काही प्रमाणात गारवा पसरला आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरण क्षेत्रात मात्र शहराच्या तुलनेत कमी पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात विशेष वाढ झालेली नाही.  शहरात आज आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. 

Related Articles