छळाला कंटाळून व्यावसायिकाच्या सुनेची आत्महत्या   

आत्महत्येनंतर नातेवाईकांकडून झांबरे पॅलेसवर दगडफेक

पुणे : कौटुंबिक छळाला कंटाळून व्यावसायिक बाळासाहेब झांबरे यांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता घडली. यानंतर संतप्त नातेवाईकांनी मुकुंदनगर भागातील झांबरे पॅलेस परिसरातील इमारतीवर दगडफेक केली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन स्वारगेट पोलिसांनी पती, सासू, सासरे, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
पायल अक्षय झांबरे (वय-34, रा. मंगलमय इमारत, झांबरे पॅलेसजवळ, मुकुंदनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी पती अक्षय अरविंद झांबरे, सासू मंगल, सासरे अरविंद, नणंद अक्षता निम्हण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पायल यांचे भाऊ ऋषिकेश रवींद्र पवार (वय-31, रा. श्रीरामनगर, खेड शिवापूर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पायल ही अभियंता होती. विवाहानंतर तिचा पती, तसेच सासरकडील नातेवाईकांडून छळ करण्यात आल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप करुन नातेवाईकांनी सोमवारी मुकुंदनगर भागातील झांबरे पॅलेस परिसरातील इमारतीवर दगडफेक केली.     
 
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पायलचा अक्षय याच्याशी 13 मार्च 2019 रोजी विवाह झाला होता. विवाहात हुंड्यापोटी 50 तोळे दागिने, 25 लाख, तसेच विवाहाचा सर्व खर्च असा मिळून 75 ते 80 लाख खर्च केला होता. विवाहानंतर पती, सासू, सासरे, नणंदेने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरहून पैसे आणण्याची मागणी करुन छळ सुरू केला. आरोपींनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Related Articles