पुण्यासह राज्यातील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी   

डझनभराहून अधिक न्यायालयांना एकाच वेळी धमकीचे ई-मेल

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयासह मुंबई, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील डझनभराहून अधिक जिल्हा न्यायालयांना सोमवारी एकाच वेळी ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी न्यायालयांमध्ये न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि कर्मचार्‍यांची मोठी गर्दी असताना हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने संपूर्ण राज्याच्या न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयीन इमारती तातडीने रिकाम्या करण्यात आल्या. तसेच, अनेक ठिकाणी न्यायव्यवस्थेचे कामकाजही काही काळ विस्कळीत झाले होते. 
 
शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी प्राप्त झाल्याचे समोर येताच न्यायालयीन प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सावध झाली. वरिष्ठ न्यायाधीशांच्या आदेशानंतर तातडीने न्यायालयातील सर्वांना बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि सुनावणीसाठी आलेल्या पक्षकारांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे न्यायालय परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. न्यायालयाचे कामकाज तात्पुरते बंद करण्यात आले, तर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. मुख्य प्रवेशद्वारांवर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला.
 
राज्यातील न्यायालयांना एकाच वेळी धमकीचे ई-मेल पाठविण्यामागे नेमके कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. ई-मेलचा मूळ स्रोत, आयपी अ‍ॅड्रेस, सर्व्हरची माहिती, बनावट डोमेन आणि व्हीपीएन किंवा प्रॉक्सी सर्व्हरचा वापर झाला आहे का, याची तांत्रिक तपासणी केली जात आहे. ही धमकी केवळ न्यायालयीन कामकाज विस्कळीत करण्यासाठी दिलेला खोडसाळपणा आहे की न्यायव्यवस्थेला लक्ष्य करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, याचा तपास विविध शक्यतांच्या आधारे केला जात आहे.
 
न्यायालय परिसरात कसून तपासणी
 
धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), श्‍वान पथक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी तातडीने न्यायालयात दाखल झाले. न्यायालयातील प्रत्येक मजला, न्यायाधीशांचे कक्ष, बार रूम, रेकॉर्ड रूम, स्वच्छतागृहे तसेच वाहनतळाची कसून तपासणी करण्यात आली. संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्यासाठी विशेष यंत्रणांच्या मदतीने संपूर्ण परिसराची झाडाझडती घेण्यात आली. न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने शिवाजीनगर न्यायालयाला छावणीचे स्वरूप आले होते.
 
मुंबईपासून विदर्भापर्यंत धमकीचे ई-मेल
 
राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांना एकाच वेळी धमकीचे ई-मेल प्राप्त झाले. मुंबईतील दिंडोशी, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली आणि अमरावतीसह अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाले होते. एकाच वेळी राज्याच्या विविध भागांतील न्यायालयांना लक्ष्य करण्यात आल्याने पोलिस यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. संबंधित जिल्ह्यांतील पोलिसांनी तातडीने न्यायालयांचा परिसर सुरक्षित करून बॉम्ब शोधक पथकांच्या मदतीने तपासणी सुरू केली. सुदैवाने, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

Related Articles