मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल   

पुणे: शहरात सोमवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामांचा अक्षरशः बोजवारा उडविला. अवघ्या काही तासांत झालेल्या सुमारे 20 मिलिमीटर पावसाने शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले होते. कोट्यवधी खर्च करून पावसाळी गटारे, ड्रेनेज लाइन आणि चेंबरच्या सफाईचे दावे करणार्‍या महापालिकेच्या कामांचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले. दरवर्षी निविदांच्या माध्यमातून साफसफाईवर लाखो-कोट्यवधी रुपये खर्च होतात. मग हा पैसा नेमका कोणाच्या कामी आला, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र, शनिवारी शहराच्या पूर्व भागात पाऊस पडला. तर रविवारी सकाळी आणि त्यानंतर रात्री पावसाचा जोर वाढला आणि अनेक भागांत पाणी साचण्याच्या घटना घडल्या. कोथरूड परिसरात सर्वाधिक 10 ते 15 ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या. 
 
याशिवाय ढोले पाटील रस्ता आणि बावधन परिसरातही रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. रस्त्यांवर पाण्याचे डबके साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला, तर काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली. महापालिकेच्या दाव्यानुसार, पावसाळी वाहिन्या आणि ड्रेनेज लाइनची साफसफाई यापूर्वीच करण्यात आली होती. मात्र, पावसाळ्यानंतर साचलेला पाला-पाचोळा आणि कचरा वाहिन्यांच्या तोंडाशी जमा झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण झाले. त्यामुळे साफसफाईच्या कामांच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 
दरम्यान, पावसामुळे शहरात सात ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. महापालिकेचे 150 ते 200 कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून परिस्थिती हाताळत होते. अग्निशमन दलाचे प्रमुख तथा सहमहापालिका आयुक्त गणेश सोनुने यांनी ही माहिती दिली. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि ड्रेनेज सफाईचे दावे केले जातात. मात्र, प्रत्यक्ष पावसात रस्त्यांवर पाणी साचत असेल, तर या कामांचे लेखापरीक्षण आणि जबाबदारी निश्‍चित करण्याची वेळ आली आहे. 
 
 शहरात मुसळधार पावसाच्या हजेरीनंतर काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. कर्मचार्‍यांना सूचना देण्यात आल्या. कोथरुड भागात सर्वाधिक तक्रारी होत्या. - प्रजित नायर, अतिरिक्त आयुक्त.

Related Articles