’मनोरंजन’ संस्थेने नाट्य व्यवस्थापन शास्त्र विकसित केले   

सतीश आळेकर यांची मोहन कुलकर्णी यांना श्रद्धांजली

पुणे : नाट्य व्यवस्थापन कसे करावे याचा अभ्यासक्रम आणि त्याचे प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून ‘मनोरंजन’ची ओळख आहे. खर्‍या अर्थान या संस्थेनेच नाट्य व्यवस्थापन शास्त्र विकसित केले. त्यात मोहन कुलकर्णी यांचा वाटा मोठा आहे. अशा शब्दांत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी मोहन कुलकर्णी यांना सोमवारी श्रध्दांजली वाहिली. 
 
नाट्यव्यवस्थापक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजक मोहन कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सभेत आळेकर बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, माजी महापौर अंकुश काकडे, पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉ. सतीश देसाई, ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’च्या शुभांगी दामले, अभिनेत्री वीणा फडके, ‘रसिकमोहिनी’ संस्थेच्या भाग्यश्री देसाई, श्याम भुर्के, ‘मेलडी मेकर्स’चे अशोककुमार सराफ, ‘चौरंग’ संस्थेचे अशोक हांडे, ‘पूना गेस्ट हाऊस’चे किशोर सरपोतदार, भरत नाट्य मंदिराचे रवींद्र खरे, महापालिका रंगमंदिरांचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे, शंकर जाधव, उषा अरगडे, ‘हमलोग’ संस्थेचे सुनील देशपांडे, ‘मनोरंजन’ संस्थेचे भागीदार शिरीष रायरीकर आणि मोहन कुलकर्णी यांची कन्या पूर्वा कुलकर्णी आठवले यांनी श्रद्धांजली वाहिली. 
 
आळेकर म्हणाले, नाटकाचा पडदा सुरू होऊन प्रयोग संपल्यावर सेटची आवराआवर करण्यापासून ते कलाकारांच्या भोजनाची व्यवस्था या सार्‍या गोष्टी महत्त्वाच्या असतात याचे भान ‘मनोरंजन’ संस्थेने आपल्याला दिले. नाटकाचे वेडे होण्यासाठी केवळ कलाकार किंवा प्रेक्षक लागतात असे नाही. तर, मोहन कुलकर्णी यांच्यासारखे पडद्यामागे काम करणारे कार्यकर्तेही आवश्यक असतात. झुलता पूल’ या 1971 मध्ये रंगमंचावर सादर झालेल्या माझ्या पहिल्या एकांकिकेपासून मनोरंजन संस्थेचे मनोहर कुलकर्णी, नाना रायरीकर यांच्यासह मोहन कुलकर्णी, शिरीष रायरीकर या नंतरच्या पिढीशी संबंध आला. 
 
माझ्या रंगमंचीय कारकीर्दीचा मोहन साक्षीदार होता. नाटक करणार्‍या प्रत्येकाला मनापासून सर्वतोपरी मदत करण्यासाठी तो सदैव तत्पर असायचा. रंगमंचावर व्यक्त होणार्‍या नव्या संवेदनांविषयी मोहनशी चर्चा व्हायची. ललित कला केंद्राच्या मुक्ता बर्वे, अनिता दाते या विद्यार्थ्यांच्या नाटकांना त्याने मदत केली.‘आई रिटायर होते’ नाटक कधीच न रिटायर होऊ देणारे मोहन कुलकर्णी हेमला मोठ्या बंधूसमान होते, अशी भावना वीणा फडके यांनी व्यक्त केली. एक महिला नाट्यक्षेत्रात काही करू पाहते तिला मदत करण्याबरोबरच नाट्यनिर्माती म्हणून प्रस्थापित करण्यात कुलकर्णी याचे मोठे योगदान आहे, अशी कृतज्ञता भाग्यश्री देसाई यांनी व्यक्त केली.
 
मनोरंजनचा वसा चालू ठेवणार 
 
बालपणापासून आमची मैत्री होती. नंतर कामही एकत्र आणि एकाच कार्यालयातून केले. माणसे जमवणे हेच मोहनचे व्यसन होते. ‘मनोरंजन’च्या  कार्यालयात माझ्या शेजारची रिकामी खुर्ची आता मला त्रास देत राहील. मला फसवून लवकर गेलास. मात्र तुझी आठवण म्हणून ‘मनोरंजनचे कार्य चालू ठेवणार.
- शिरीष रायरीकर, भागीदार, मनोरंजन

Related Articles