आंदोलनावरील निर्बंधांविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक   

पुणे विद्यापीठात ठिय्या आंदोलन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन करण्यासंदर्भात घालण्यात आलेले निर्बंध मागे घ्यावेत, या मागणीसाठी विद्यापीठातील विविध विद्यार्थी संघटना सोमवारी एकवटल्या. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर जोरदार आंदोलन करत संघटनांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा आणि प्रशासनाचा निषेध केला. सुरक्षा विभागाने लावलेले बॅरिकेड्स ओलांडून विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
 
विद्यापीठ हे शासकीय असून शासनाच्या जागेत आहे. त्यामुळे या परिसरात कोणत्या विषयावर, केव्हा आणि कशा पद्धतीने आंदोलन करायचे याचा अधिकार विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाने दिला आहे. आंदोलन करावे किंवा करू नये, याबाबत निर्बंध घालण्याचा अधिकार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला नाही. त्यामुळे आंदोलनासंदर्भात प्रसिद्ध केलेले परिपत्रक विद्यापीठाने तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली.
 
सावित्रीबाई फुले यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण दिली. मात्र, त्यांच्याच नावाने ओळखल्या जाणार्‍या विद्यापीठात विद्यार्थ्यांना अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यापासून रोखले जात आहे. मुख्य इमारतीच्या परिसरात विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. विद्यापीठ हे कोणाच्या मालकीचे नसून विद्यार्थ्यांना संविधानाने दिलेल्या अधिकारांची जाणीव करून देणारे ज्ञानपीठ आहे. त्यामुळे घटनाविरोधी निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ति-स्वातंत्र्यावर गदा आणू नये, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले.सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास काही विद्यार्थी संघटनांनी मुख्य इमारतीच्या आवारात आंदोलन सुरू केले. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास अन्य संघटनांनी जयकर ग्रंथालयापासून मुख्य इमारतीपर्यंत मोर्चा काढला. या वेळी सुरक्षा विभागाने लावलेले बॅरिकेड्स ओलांडून विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या दिला.
 
दरम्यान, विद्यापीठात आंदोलन करण्यावर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. विद्यापीठात विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर संघटनांकडून आंदोलने केली जातात. त्यामुळे विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण अस्थिर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध घालण्याचा विद्यापीठाचा कोणताही हेतू नाही. तरीही व्यवस्थापन परिषदेने काढलेल्या परिपत्रकाबाबत चर्चा केली जाईल. येत्या 4 नोव्हेंबर रोजी होणार्‍या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.

Related Articles