अतिवृष्टी व पूरबाधित शेतकर्‍यांना २९१ कोटींची मदत   

३ लाख शेतकर्‍यांना लाभ

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यावर दुष्काळाचे सावट असले तरी जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत  काही भागात अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा फटका बसला होता. यातील शेतकर्‍यांना राज्य सरकारने २९१ कोटी ९१ लाख ४ हजारांची मदत मंजूर केली आहे. पिकांच्या नुकसानीसाठी २६२ कोटी, तर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २९ कोटींचा निधी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. मदत व पुनर्वसन विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार पात्र शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत देण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत ३ लाख ९ हजार २८९ बाधित शेतकर्‍यांच्या २ लाख ६८ हजार ९१८.२९ हेक्टर क्षेत्रासाठी २६२ कोटी ६९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोकण आणि नाशिक विभागांतील बाधित शेतकर्‍यांचा यामध्ये समावेश आहे. या मदतीचा लाभ सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्ह्यांतील पात्र शेतकर्‍यांना होणार आहे. शेतीपिकांच्या नुकसानीची मदत थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, असेही मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले.

Related Articles