‘भाजपची लोकशाही व राज्यघटना बचाव मोहीम दिशाभूल करणारी’   

काँग्रेसची टीका

मुंबई, (प्रतिनिधी) : दिल्लीतील रामलीला मैदानावरील इंडिया आघाडीच्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’  महारॅलीने दिल्लीतील मोदी सरकार हादरले आहे. यामुळे भाजप देशभर ‘लोकशाही बचाओ, संविधान बचाओ रॅली’ काढत आहे, परंतु, राज्यघटना व लोकशाहीचे खरे मारेकरी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक हेच आहेत.  भाजपची ‘लोकशाही व संविधान बचाओ’ मोहीम म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
 
भाजपच्या रॅलीचा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचा समाचार घेताना सपकाळ म्हणाले, १३ वर्ष सत्तेत राहूनही भाजप आजही जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राहुल गांधी यांच्यावरच आरोप करत आहे. २०२४ च्या निवडणुकीत मतचोरी करून मोदी व फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले आहे, त्यांची मतचोरी पकडली असून, त्यांची सत्ता तर जाणारच आहे. पण, सत्ता गेल्यानंतर कारवाई होणार, या भीतीने त्यांची झोप उडाली आहे. मोदी-शहा सरकार ज्ञानेश कुमार यांच्या मदतीने १३ कोटी नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवत आहे. हा राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार भाजप सरकार हिरावून घेत आहे. घुसखोरांची भाषा करतात. पण किती घुसखोर पकडले हे मात्र सांगत नाहीत. फडणवीस यांनी घुसखोरांची आकडेवारी जाहीर करावी, घुसखोरांच्या नावाखाली नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ नका. 

Related Articles