तोतया निवडणूक निरीक्षक जाळ्यात   

सातारा, (वार्ताहर) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदानादरम्यान खळबळजनक प्रकार समोर आला. माण तालुक्यातील दहिवडी येथील मतदान केंद्रावर निवडणूक निरीक्षक म्हणून तोतया महिलेवर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
वैशाली अक्षद देशपांडे (रा. विश्वकर्मा बिल्डिंग, पाषाण-सुस रोड, पुणे) असे या तोतया महिला निरीक्षकाचे नाव आहे. जिल्हा बँकेसाठी दहिवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज, दहिवडी येथील मतदान केंद्रावर सोमवारी मतदान होता. या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलिसांकडून मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी एक महिला गळ्यात निवडणूक निर्वाचन आयोगाचे ओळखपत्र अडकवून मतदान केंद्रावर दाखल झाली. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांना तिच्याबाबत संशय आला. सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये अशा नावांच्या कोणत्याही निवडणूक निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली नसल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिची कसून उलटतपासणी केली असता तिने आपले नाव वैशाली अक्षद देशपांडे (रा. पाषाण-सुस रोड, पुणे) असल्याचे सांगितले, तसेच तिच्याकडे असलेले ओळखपत्र हे तिने २०२३ मध्ये शिवाजीनगर परिसरातील मतदानकेंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) असताना मतदानाच्या कामासाठी बनवून घेतले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. कोणताही कायदेशीर अधिकार नसताना व शासनमान्य नियुक्ती नसताना संबंधित महिलेने निवडणूक निरीक्षक बनून बनावटगिरी केल्याचे उघडकीस आले.या प्रकरणी पोलिस हवालदार अजय झुंजार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैशाली देशपांडे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Related Articles